विशेष लेख क्र.22 - आदर्श राजमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती
आदर्श राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं. आदर्श कन्या, सुशील भार्या, सर्वगुणसंपन्न माता अन् प्रजाहितदक्ष शासक अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून त्यांनी आजीवन जनसेवा केली. इतकेच नव्हे तर, सर्वधर्मियांना विश्वासात घेऊन उत्तम राज्यकारभार केला. महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम हे अहिल्यादेवी यांच्या कारकिर्दीत गुण्यागोविंदाने नांदलेत. राजकारणातून समाजकारण करून धर्मपरायणात सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या अहिल्यादेवींना हिंदू संस्कृतीतील पुण्यश्लोक ही उपाधी बहाल करण्यात आली. ही गोष्ट मराठी जनमानसाच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे. अहिल्यादेवींनी आपल्या कारकीर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाररासाठी ठोस उपाययोजना करताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. त्यांच्यासाठी देखील राजकोषात आर्थिक तरतूद केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणप...