ठाणे जिल्ह्यातील अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल खून प्रकरणामधील पिडीतांच्या वारसांना गट-क व गट ड संवर्गातील पदावर शासकीय / निशासकीय नोकरी
ठाणे,दि.02(जिमाका) :- शासन निर्णय क्र. युटीए-2021/व्र.क्र. 214/सामासु, दि.20.11.2025. शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 (सुधारित अधिनियम, 2015) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क व गट ड संवर्गातील पदावर शासकीय / निशासकीय नोकरी देण्याबाबतची सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीने छाननी अंती केलेल्या शिफारशीनुसार या विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे विचारात घेऊन आणि या दोन्ही विभागामध्ये समन्वय साधून नियुक्तीस मंजूरी देण्याचे अधिकार मा. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने दिवंगत व्यक्तीच्या कुटूंबातील एका पात्र वारसास शासकीय / निमशासकीय नोकरी द्यावयाच्या प्रलंबित प्रकरणात नोकरी देण्याबाबतची कार्यवाही दि.26 जानेवारी 2026 पूर्वी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाच्या समन्वयाने पूर्ण करावयाची आहे.
त्याकरीता ठाणे जिल्ह्यातील अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल खून प्रकरणामधील पिडीतांच्या वारसांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे 4 था मजला, सामाजिक न्याय भवन, दत्तवाड़ी. स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, ठाणे -400605 येथे दि.15 डिसेंबर 2025 पूर्वी कागदपत्रे जमा करावित.
एका पात्र वारसाची माहिती पुढीलप्रमाणे सादर करावी.
1. दिवंगत व्यक्तीची पत्नी/पती. 2. दिवंगत व्यक्तीचा विवाहीत/अविवाहीत मुलगा/मुलगी तसेच मृत्युपूर्वी कायदेशिररित्या दत्तक घेतलेला विवाहीत/अविवाहीत मुलगा/मुलगी. 3. दिवंगत व्यक्तीचा मुलगा हयात नसेल अथवा नियुक्तीसाठी पात्र नसेल तर अशा परिस्थितीत दिवंगत व्यक्तीची सून. 4. दिवंगत व्यक्तीची घटस्फोटीत/विधवा/ परित्यक्त्या मुलगी अथवा घटस्फोटीत/विधवा/परितक्त्या बहीण. 5. दिवंगत व्यक्ती अविवाहीत असल्यास त्याचा भाऊ अथवा बहीण, असे ठाणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे.
000000000
Comments
Post a Comment