फाईलींच्या पलीकडचं प्रशासन: जेव्हा ठाणे जिल्हाधिकारी 'घोंगडीवर' बसून लोकांचे अश्रू पुसतात...!
शासकीय कार्यालय म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात त्या फाईलींचे ढीग, टेबल-खुर्च्या,
साहेबांची केबिन आणि दारात उभी असलेली सामान्य माणसांची गर्दी. पण विचार करा, जर हेच
कार्यालय थेट तुमच्या गावात, तुमच्या अंगणात आलं तर? आणि साक्षात जिल्ह्याचे प्रशासकीय
सर्वोच्च प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी साहेब जर तुमच्यासोबत जमिनीवर, एका साध्या 'घोंगडीवर'
बसून तुमचे प्रश्न ऐकू लागले तर? होय, हा कोण्या चित्रपटामधला प्रसंग नाही, तर ठाणे
जिल्हा महसूल प्रशासनाने शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात घडवून आणलेली एक मूक क्रांती
आहे.
ठाण्याचे धडाडीचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण
पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी
डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसिलदार परमेश्वर कासुळे
यांच्या पुढाकारातून शहापूरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेली ही
'घोंगडी बैठक' आज संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.
या ऐतिहासिक प्रसंगाची पार्श्वभूमी
अत्यंत उत्कंठावर्धक होती. दिवसभराच्या शेतीच्या कामानंतर थकलेला शेतकरी आणि गावकरी
रात्रीच्या वेळी एका ठिकाणी जमले होते. एरवी रात्रीच्या वेळी शासकीय अधिकारी दुर्गम
भागात फिरकत नाहीत, असा एक सर्वसामान्य समज असतो. मात्र, या उपक्रमाचे सर्वात मोठे
वैशिष्ट्य हेच होते की, ही बैठक रात्रीच्या वेळी थेट गावातच आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी महोदयांचे गावात आगमन होताच पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याने
ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत केले. गावकरी आणि प्रशासकीय
अधिकारी यांच्यातील हे दृश्य नात्याची एक नवी वीण घट्ट करणारे होते. कोणताही बडेजाव
नाही, व्ही.आय.पी. संस्कृतीचा लवलेषही नाही, अशा अत्यंत साध्या,पारंपारिक वातावरणात
या घोंगडी बैठकीची सुरुवात झाली. एका बाजूला जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः
जमिनीवर सर्वसामान्य लोकांसोबत एका घोंगडीवर बसले होते.रात्रीच्या अंधारात एका साध्या
बल्बच्या उजेडात सुरू असलेला हा थेट संवाद म्हणजे केवळ एक शासकीय औपचारिकता नव्हती,
तर प्रशासन आणि जनतेमधील तुटत चाललेल्या विश्वासाला जोडणारा एक भक्कम सेतू होता. या
बैठकीला शहापूर तालुक्यातील ग्रामस्थांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्षानुवर्षे
मनात साचलेले प्रश्न घेऊन आशेने डोळे लावून बसलेले नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने
या ठिकाणी हजर होत्या.
बैठकीत ग्रामस्थांनी पिण्याच्या
पाण्याचा बिकट प्रश्न, दळणवळणासाठी खराब झालेले रस्ते, वीजपुरवठा, वनहक्क दाव्यांमधील
अडचणी, शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आणि जमीनविषयक गुंतागुंतीचे प्रश्न अशा
स्थानिक विकासकामांबाबतच्या अनेक समस्या थेट मांडल्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी
प्रत्येक विषयाची स्वतः सविस्तर नोंद घेतली आणि फाईलींच्या चौकटीबाहेर पडून कामाला
गती दिली. कार्यालयात वातानुकूलित केबिनमध्ये बसून फाईली पाहिल्या जातात, निर्णय घेतले
जातात; पण गावात येऊन लोकांचे चेहरे, त्यांच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि त्यांचे वास्तव
प्रश्न समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं, म्हणूनच अशा घोंगडी बैठकी लोकशाहीला अधिक
बळकट करतात, असा दृढ विश्वास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी व्यक्त
केला.
गावात जाऊन घोंगडीवर बसून झालेला
हा थेट संवाद अधिकारी आणि जनता यांच्यातील अंतर कमी करतो, परस्पर विश्वास वाढवतो आणि
अपेक्षा, कृती तसेच समन्वयातून विकासाचा मार्ग अधिक सुकर करतो, हेच या बैठकीने दाखवून
दिले. हा केवळ एका व्यक्तीचा उपक्रम नव्हता, तर ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक संवेदनशीलतेचे
आणि उत्कृष्ट टीम वर्कचे हे उत्तम उदाहरण होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
यांच्या या लोककल्याणकारी मोहिमेला गती देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ,
भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि स्थानिक तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह
संपूर्ण महसूल यंत्रणेतील महत्त्वाचे अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी या घोंगडीवर
रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. अधिकाऱ्यांनी केवळ लोकांच्या तक्रारी ऐकल्या
नाहीत, तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट तळागाळातील लोकांपर्यंत
पोहोचवली आणि "प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," हा विश्वास प्रत्येक
ग्रामस्थाच्या मनात निर्माण केला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या
प्रसारमाध्यमांनीदेखील या उपक्रमाचे अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी स्वागत केले
आहे. फाईलींमधील कोरड्या अक्षरांपेक्षा माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणं हेच खऱ्या
संवेदनशील प्रशासनाचं लक्षण आहे, अशा शब्दांत प्रसारमाध्यमांनी या घोंगडी बैठकीचे कौतुक
केले असून हा लोकाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श वस्तुपाठ ठरत असल्याचे म्हटले आहे. आजवर
आम्ही साहेबांना भेटायला शहरात जायचो, तासनतास लायनीत थांबायचो, पण आज साहेब स्वतः
आमच्या घोंगडीवर येऊन बसले आणि आमचं सुख-दुःख त्यांनी आपलं मानलं, अशी भावुक प्रतिक्रिया
एका ज्येष्ठ ग्रामस्थाने दिली.
शहापूर तालुक्यातील हा उपक्रम
केवळ एका रात्रीपुरता मर्यादित नसून, तो राज्याच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला एक
नवी सकारात्मक दिशा दाखवणारा प्रकाशस्तंभ ठरला आहे. विशेष म्हणजे या घोंगडी बैठकीनंतर
"डोळखांब" या गावात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी मुक्कामास होते.
विकास प्रक्रियेत अंतिम घटकाचा सहभाग वाढवण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतील यात
शंका नाही. माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या या 'घोंगडी बैठकी'ला आणि ठाणे जिल्हा
महसूल प्रशासनाच्या या कौतुकास्पद पुढाकाराला मनापासून शुभेच्छा, प्रशासनाचा हाच 'ठाणे
पॅटर्न' उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची ओळख बनो, हीच सदिच्छा!
(मनोज सुमन शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी
ठाणे
0000000000
.jpeg)
Comments
Post a Comment