कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांची शहापूर तालुक्यातील आदिवासी भागास भेट 'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी व शाश्वत शेती पद्धतींची केली पाहणी वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी' पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी बंधनकारक

 




 

ठाणे,दि.8(जिमाका): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कृषी योजनांच्या लाभासाठी 'अ‍ॅग्रीस्टॅक' (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी (Farmer ID) नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी केवळ ७/१२ उतारा असलेल्या शेतकऱ्यांचीच ही नोंदणी होत होती, मात्र आता वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.   

            आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) मार्फत ज्या वनपट्ट्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांचा डेटा 'अ‍ॅग्रीस्टॅक' पोर्टलला जोडण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व वनपट्टाधारक व इतर शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन किंवा कृषी व महसूल विभागामार्फत गावोगावी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपली नोंदणी तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

            सचिव श्री.परिमल सिंह यांच्याकडून "थेट शेतकऱ्यांशी संवाद" या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर,  ६ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी व पदुम विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांचा शहापूर तालुक्यात महत्त्वपूर्ण दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वनपट्टे धारक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून 'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच आगामी खरीप व रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

            दौऱ्यापूर्वी ठाणे येथे जिल्हास्तरावरील मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अचूक आरोग्य पत्रिका तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता काय उपाय योजना करता येईल, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गाव स्तरावर शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिकामधील शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा, यासाठी अधिकाऱ्यांनी जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्याच्या सूचना मा. सचिव महोदयांनी उपस्थितांना दिल्या.

'जय भवानी शेतकरी उत्पादक गटाला' भेट आणि कौतुक..

            सचिवांनी पाणी फाउंडेशन 'फार्मर कप' अंतर्गत कृषी विभागामार्फत स्थापन झालेल्या 'जय भवानी भात शेतकरी उत्पादक गट, खरीवली सो.' येथील गटाला भेट दिली. यावेळी गटामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले गोकृपा अमृत व जीवामृत, SRT (सगुणा राईस तंत्रज्ञान) भात लागवड पद्धत आणि गटामार्फत करण्यात आलेली एकत्रित भात बियाणे खरेदी यांचा समावेश होता. या सेंद्रिय आणि किफायतशीर शेती पद्धतींबद्दल त्यांनी गटातील शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले.

"शेती प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती"

            या दौऱ्यात सचिव महोदयांनी स्थानिक शेतकरी श्री. मनोज हरड यांच्या शेताला भेट देऊन, त्यांनी पाणी बचतीसाठी व उत्पादकतेसाठी तयार केलेले कूपनलिका पुनर्भरण (Borewell Recharge) आणि SRT गादीवाफे (Raised Beds) यांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव केला.

            या दौऱ्यादरम्यान कृषी क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने श्री. अंकुश माने  (संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य), श्री. शिवाजी आमले (विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे), श्री.रामेश्वर पाचे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक 'आत्मा', ठाणे), श्री.विनायक पवार (प्रकल्प संचालक 'आत्मा', पालघर), श्रीम.वंदना शिंदे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड), श्रीम.मनाली तांबडे (प्रकल्प उपसंचालक 'आत्मा'), श्री.आशिष बालगुडे (उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण) आणि श्री. कुमार जाधव (तालुका कृषी अधिकारी, शहापूर) यांच्यासह तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

            शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी 'फार्मर आयडी' नोंदणी मोहीम यशस्वी करावी. तसेच मृदा आरोग्य पत्रिका मधील शिफारशीनुसार खतांच्या संतुलित वापराबरोबरच शेतावरच तयार केलेल्या नैसर्गिक शेती निविष्ठांचा वापर करावा, असे आवाहनही याप्रसंगी कृषी विभागाकडून करण्यात आले.

0000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न