पत्रपरिषदः लोकसभा निवडणूक 2019: जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे, दि.30 (जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 ची सर्व जय्यत तयारी ठाणे जिल्ह्यात सुरु असून जिल्हा निवडणूक यंत्रणा  ही सर्व निवडणूक प्रक्रिया शांतता, निर्भयतेच्या वातावरणात व पारदर्शक पणे पार पाडण्यास सज्ज आहे, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. यंदाच्या निवडणूकीत संपुर्ण पणे महिलांद्वारे संचलित केलेली सखी मतदान केंद्रे, दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचलित केलेली मतदान केंद्र तसेच मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाधिक सुविधांची निर्मिती करणे ही वैशिष्ये असतील. जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढल्याने आधीच्या 6488 मतदान केंद्रांच्या संख्येत 227 मतदान केंद्रांची भर पडणार आहे, असेही यावेळी श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  जिल्ह्यातील 23- भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या तिनही लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी ठाण्याचे अनिल पवार, भिवंडीचे किशन जावळे, कल्याणचे शिवाजी कादबाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त घुले,अपर पोलीस अधिक्षक  संजयकुमार पाटील   आदी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात मतदार नोंदणीस मतदारांनी उत्तम, प्रतिसाद दिला असून त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत जिल्ह्यातील एकूण 6488 मतदान केंद्रात आता 227 सहाय्यकारी मतदान केंद्र वाढणार आहेत. मतदार नोंदणी दि.30 मार्च पर्यंत करण्यात आली असून नव्याने नाव नोंदणी झालेल्या मतदाराची स्वतंत्र पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यासाठी आवश्यक मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट मशिन्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूण त्यांची प्रथमस्तरीय चाचणी झाली आहे. तसेच मतदान यंत्रांची विधानसभा मतदारसंघ निहाय सरमिसळ ही पूर्ण झाली आहे.
येत्या 2 एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठी तिनही मतदार संघात अर्ज विक्री, अर्ज स्विकारणे, अनामत रक्कम भरणे या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी येथे बसस्थानकासमोर असणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. तसेच कल्याण येथे वै. हभप सावळाराम म्हात्रे क्रीडा संकूल  डोंबिवली येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. तर ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी यांचे दालनात हे कार्यालय आहे. येथे नामनिर्देशनाशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
निरीक्षकांची नियुक्ती
या निवडणूकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती होणार असून सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक प्रति दोन मतदार संघ, आणि स्वीप निरीक्षक हे लोकसभा मतदारसंघ निहाय असतील. त्याच प्रमाणे दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी पुरवावयाच्या सुविधांबाबत विभागीय आयुक्त हे निरीक्षक असतील.
मतदान यंत्रांची सरमिसळ पूर्ण
जिल्ह्यातील तिनही मतदार संघांसाठी लागणाऱ्या इव्हीएम यंत्रांची प्रथम स्तरीय विधानसभा क्षेत्रनिहाय सरमिसळ पूर्ण झाली आहे. त्यानंतर ते मतदान यंत्र विधानसभा क्षेत्रनिहाय पाठविण्यात येतील. तेथे निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांची दुसऱ्यास्तरावरची सरमिसळ होईल.
पुरेसे मनुष्यबळ व निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी 47 हजार इतके मनुष्यबळा लागणार आहे. हे सर्व मनुष्यबळ उपलब्ध आहे. या कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण सत्रे पार पडली आहेत. त्यांना आता पुढील टप्प्यात प्रत्यक्ष यंत्र हाताळणी द्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणांना अनुपस्थित राहणाऱ्या 5400 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसाही प्रशासनाने बजावल्या आहेत.
मतदान केंद्रांवर सुविधा
मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार द्यावयाच्या सुविधांच्या उपलब्धतेची आपण पाहणी केल्याचे सांगून श्री. नार्वेकर म्हणाले की, या निवडणूकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, दिव्यांग मतदारांच्या प्रकारानुसार आवश्यक सुविधांची उपलब्धता करण्यात येणार आहे.  याशिवाय सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक तेथे सावलीची व्यवस्था, प्रथमोपचार पेटी व पाळणाघर सुविधा यांचीही उपलब्धता करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिली. या शिवाय दिव्यांगांनी मागणी केल्यास त्यांना घरुन मतदान केंद्रापर्यंत ने- आण करण्यासाठी वाहनाची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यंदा मतदान केंद्रांवर तीन रांगा असणार आहेत. पुरुष , महिला व अन्य एक रांग ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व गर्भवती महिलांसाठी अशी एक रांग असेल. मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही नार्वेकर यांनी सांगितले.
महिला व दिव्यांग चालविणार मतदान केंद्र
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात काही मतदान केंद्र हे संपूर्णतः महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित केले जातील. तर काही दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे चालविले जातील, अशीही माहिती देण्यात आली. अशी केंद्र प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय किमान एक तरी असेल, असा विश्वास श्री. नार्वेकर यांनी व्यक्त केला.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
निवडणूक हि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाया पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहेत.  त्याअंतर्गत जिल्ह्यात 84 हजार लिटर अवैध मद्यसाठी जप्त करण्यात आला. ठाणे ग्रामीण पोलीसांनी 25 किलो ड्रग पकडला आहे. तर 32 अवैध शस्त्रे आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.  आचारसंहिता भंगा संदर्भात सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणाबाबत चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. काटेकओर आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगत, ही निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडेल असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
 ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या चवथ्या टप्प्यात मतदान होणार असून येत्या 2 एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल अशी आहे. नामनिर्देशन पत्र हे मंगळवार दि.2 ते मंगळवार दि. 9 या दरम्यान सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त  सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळात भरता येईल. तर बुधवार दि.10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अर्ज छाननी प्रक्रिया होईल. त्यानंतर शुक्रवार दि.12 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत असेल.तर 29 एप्रिल रोजी मतदान होईल व 23 मे रोजी मतमोजणी होऊन 27 मे पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

00000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न