जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी
ठाणे,दि.23(जिमाका):- परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचित केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्याकामी अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) चे महत्व लक्षात घेता या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. त्याकरिता परिवहन विभागाने या कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD., एजन्सीची नियुक्ती केली असून शुल्क आणि लागणारा वेळ/दिवस निर्धारित केले आहेत.
टू-व्हिलर्स आणि ट्रॅक्टर्स: रु.450, थ्री-व्हिलर्स: रु.500, लाईट मोटर वेहिकल्स/ पॅसेंजर कार/ मिडीयम कमर्शियल वेहिकल/ हेवी कमर्शियल वेहिकल आणि ट्रेलर/ कॉम्बिनेशन: रु.745 असे शुल्क आहेत.
या एजन्सीची HSRP बुकिंग पोर्टल लिंक https://hsrpmhzone2.in आहे. या लिंकवर वाहनांसंबधीत आवश्यक सर्व माहिती अचूक भरावी.
परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून HSRP लावून मिळणार आहे. वाहनमालकांनी परिवहन विभागाने जारी केलेल्या SOP नुसार दि.31 मार्च 2025 पर्यंत जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment