खरीप हंगाम 2019 आढावा बैठक शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवा-ना.एकनाथ शिंदे जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन



ठाणे दि. 31 (जिमाका)- खरीप हंगामाचे नियोजन करीत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन पीक पद्धती,पोहोचवावे तसेच पीक कर्ज, पीक विमा,अनुदान यासारख्या आर्थिक सुरक्षा देणाऱ्या योजनाही त्यांच्या पर्यंत पोहोचवाव्या व जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
सन 2019 च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले असून या हंगामात 1 लक्ष 57 हजार 949 मे. टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरीप नियोजन बैठकीत ही माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने व अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी 2018 च्या खरीप हंगामाचा आढावा व 2019 चे नियोजन सादर केले. त्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली की, सन 2018 मध्ये 58 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊन 1 लक्ष 44 हजार 229 मेट्रिक टन उत्पादन झाले. जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या भात पिकाची उत्पादकता 2553 किलो प्रति हेक्टर इतकी होती. या शिवाय नागलीचे पिक हे 805 किलो प्रति हेक्टर इतके आले.
सन 2019 साठी जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून 1 लक्ष 57 हजार 949 मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. या हंगामासाठी प्रामुख्याने भात पिकासाठी 59 हजार 279 हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून 2578 किलो प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्षांक निश्चित केला आहे. यासाठी जिल्ह्याला 10 हजार 670 क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आजअखेर 5192 क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. तसेच14 हजार 280 मेट्रीक टन खतांचे आवंटन प्राप्त झाले असून प्रत्यक्ष 14745 मेट्रिक टन खत पुरवठा झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याशिवाय 2260 हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. तर 1210 हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, 880 हेक्टरवर उडीद, 190 हेक्टरवर मुग, 1320 हेक्टरवर तूर, 237 हेक्टरवर गळीत धान्य पिके, 533 हेक्टरवर इतर कडधान्य असे पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गत खरीप हंगामात प्रत्यक्षात 58869 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.
भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारीय बियाण्यांचा वापर, लागवड पद्धतीत बदल तसेच कडधान्य उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्यासाठी जिल्ह्यात दि.24 मे पासून17जून पर्यंत उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवडा साजरा करण्यात येत असून यात जिल्ह्यातील 891 गावांमध्ये 752 सभा मेळावे घेण्यात येणार आहे. आज पर्यंत या अभियानात 15569 शेकऱ्यांपर्यंत माहिती 344 मेळाव्याद्वारे पोहोचविण्यात आली आहे, अभियान अजून सुरू आहे.
जनजागृती चित्ररथ रवाना

उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानाअंतर्गत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पिक लागवड पद्धती, आधुनिक पद्धती, व उत्पादन वाढीसाठीच्या उपाययोजनांचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथास आज ना. शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. तसेच जनजागृतीपर प्रचार साहित्य, पोस्टर, घडी पुस्तिका यांचे विमोचनही करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न