पाणी टंचाई आढावा बैठक टंचाई भागातील पाणी पुरवठ्यास सर्वोच्च प्राधान्य द्या- ना.एकनाथ शिंदे
ठाणे दि. 31 (जिमाका)-
जिल्ह्यात पाणी टंचाई असलेल्या भागात टंचाई निवारणाची कामे पूर्णत्वास नेण्यास सर्वोच्च प्राधान्य
देऊन यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत. ग्रामिण भागात दिले जाणारे पाण्याचे
प्रति व्यक्ति प्रमाणही वाढवावे, तसेच पाण्याचे स्त्रोत प्रदुषित होणार नाहीत
याबाबत कडक उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असे
निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व
कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजनांचा
आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक पार पडली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती
कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड,जिल्हा परिषद उपाध्यक्ष
सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक
सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने व अन्य
अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यातील पाणी
टंचाई व उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी ना. शिंदे म्हणाले की,
टंचाईच्या काळात दुर्गम भागातील लोकांना
पाणी पुरवठा करुन दिलासा देणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेने
कुठल्याही प्रकारचा वेळाकाढूपणा करु नये.
यावेळी भातसा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी
सोडणे, धरणांमधील गाळ काढणे, टॅंकरद्वारे
पाणी पुरवठा करतांना पाणी उचलण्यासाठी टॅंकरला पंप बसवणे आदी उपायांची अंमलबजावणी
करण्याबाबत निर्देश देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित लोकप्रतिनिधींनी
सहभाग घेऊन आपापल्या क्षेत्रातील पाणी प्रश्नाबाबत चिंता व्यक्त केली.
जिल्हा प्रशासनाने
पाणी टंचाई निवारण उपाययोजनांना तातडीने मान्यता देऊन पाणी प्रश्न सर्वोच्च
प्राधान्याने सोडवावे, असे निर्देश यावेळी ना. शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना
दिले.
00000
-
Comments
Post a Comment