मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनाचे काम संघभावनेने करावे- ना.एकनाथ शिंदे
ठाणे दि. 31 (जिमाका)- जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती
व्यवस्थापनाचे नियोजन करताना, आपत्ती व्यवस्थापनाचे काम हे सर्व विभागांनी संघभावनेने
करणे आवश्यक आहे,अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक
आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे जिल्हा प्रशासनातील
अधिकाऱ्यांना केली.
ठाणे जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी
आज पालकमंत्री ना. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात
आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील,
आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत
गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य
सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश
नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने व अन्य अधिकारी- कर्मचारी
उपस्थित होते.
यावेळी निर्देश देण्यात आले की, जिल्ह्यातील सर्व विभागांनी
1 जून पासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करुन कार्यान्वित करावेत. जिल्हा मुख्य
नियंत्रण कक्ष हा कार्यरत असून तेथे टोल फ्री क्रमांक 1077 व 022-25301740 तसेच
022-25381886 हे दूरध्वनी कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे कोणत्याही आपत्तीच्या
घटनेची माहिती संबंधितांनी कळवावी.
पाटबंधारे विभागाने प्रत्येक धरण क्षेत्रात पर्जन्यमापक
यंत्र बसवून पडणाऱ्या पावसाचे संनियंत्रण करावे. धरणातून विसर्ग करावयाचा असल्यास नदी
काठावरील गावांना पूर्वसुचना द्यावी. सर्व नगरपालिका, महानगरपालिकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात
पावसाळापूर्व नालेसफाईची कामे पूर्ण करुन शहरातील कोणत्याही सखल भागात पाणी तुंबणार
नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या काठावरील झाडांच्या
फांद्या पडून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वृक्ष उन्मळून पडल्यास
ते तात्काळ हटविण्याची व्यवस्था करावी आरोग्य विभागाने साथीचे आजार फैलावणार नाहीत
याची दक्षता घ्यावी. औषधांचा साठा परिपूर्ण ठेवावा. पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे
औषध साठा उपलब्ध ठेवणे, साथीचे आजार फैलावणार नाहीत याची दक्षता घेणे, एमटीएनल ने दूरसंचार
सेवा सुस्थितीत ठेवणे, वादळ, पावसामुळे यंत्रणा बंद पडल्यास ती तात्काळ पूर्ववत करणे,
गृहरक्षक दलाने पोलिसांच्या मदतीसाठी तत्पर असणे या प्रमाणे सर्व विभागांना सुचना देण्यात
आल्या. तसेच सागरी किनारपट्टी भागात उधाणाच्या स्थितीबाबत माहिती देणे, गावकऱ्यांना
व मच्छिमारांना कळविणे यासाठी स्थानिक प्रशासनाने यंत्रणा राबवावी. प्रत्येक विभागाने
त्यांच्या मार्फत करण्यात आलेल्या सज्जतेबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.
Comments
Post a Comment