कौस्तूभ तारमाळे यांना सर्वोत्तम जीवनरक्षा पदक मरणोत्तर प्रदान पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते मातोश्री रत्नप्रभा तारमाळे यांनी केला स्विकार



ठाणे दि. 31 (जिमाका)- जिल्ह्यातील कौस्तूभ भगवान तारमाळे यांनी बुडणाऱ्या मुलांचे प्राण मोठ्या धाडसाने वाचविले होते. परंतू या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोत्तम जीवनरक्षा पदक मरणोत्तर जाहीर झाले. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिवंगत कौस्तूभच्या मातोश्री श्रीमती रत्नप्रभा भगवान तारमाळे यांना हे जीवनरक्षा पदक सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने व अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. सन्मानपत्र,पदक व दोन लक्ष रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यात आले.
या संदर्भातील पार्श्वभुमी अशी की, दिनांक १२ मे, २०१८ रोजी खडवली (कासणे) येथील भातसा नदीत पोहण्यासाठी सात मुले खोल गेली होती. भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भवऱ्यात अडकली व बुडू लागली. हे भातसा नदीच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या कौस्तुभ भगवान तारमाळे , वय २४ वर्ष रा . मौजे - शेई, ता. शहापूर याने पहिले व क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात बुडणाऱ्या मुलांना वाचविण्यासाठी नदीमध्ये मुलांच्या दिशेने उडी मारली व मुलांचे प्राण वाचविले.मात्र बुडणाऱ्या मुलांना वाचवताना शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे कौस्तुभ भगवान तारमाळे यांचा मृत्यु झाला .
 या प्रकरणी कै. कौस्तुभ  भगवान तारमाळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी केंद्रशासनाच्या जीवनरक्षा पदक पुरस्कार - २०१८ साठी त्यांचा प्रस्ताव विहित नमुन्यात गृह विभाग महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार,  गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडील पत्र क्र . १७/८/२०१८ दि . २९/८/२०१९ अन्वये  कौस्तुभ  भगवान तारमाळे यांची सन २०१८ साठी जीवन रक्षा  पदक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . त्यानुसार केंद्र शासनाकडून प्राप्त जीवन रक्षा पदक प्रमाणपत्र  व रक्कम दोन लाख रुपयांचा धनादेश दिवंगत कौस्तुभ  भगवान तारमाळे यांच्या मातोश्री श्रीमती रत्नप्रभा  भगवान तारमाळे यांना ना . शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न