मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन 50 टक्के निधी उपलब्ध करून देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन
50 टक्के निधी उपलब्ध करून देणार
                                              -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे, दि.29  : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. 26 व 27 जुलै रोजी झालेल्या बदलापूर-कल्याण परिसरातील पुरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून राज्य शासन नुकसानग्रस्तांना भरीव मदत करेल आणि गरज भासल्यास नव्या निकषानुसार शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आज ठाणे जिल्हयातील मुरबाड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळयाचे अनावरण, पोलस स्टेशन मुरबाड आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी वसाहत उद्घाटन समारंभात मा.मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, सर्वश्री आमदार नरेंद्र पवार, किसन कथोरे, निरंजन डावखरे, माजी आ. गोटीराम पवार, दिगंबर विशे, नगराध्यक्ष सौ.शितल तोंडलीकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार, कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पुर्णकृती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण माझ्या हस्ते झाले हा माझ्यादृष्टीने भाग्याचा दिवस आहे. आज विविध कामांची सुरुवात या भागात होत आहे. शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य केले. महाराजांनी सामान्य माणसाला जागृत करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. गेली 5 वर्षे आम्ही शिवछत्रपतींचे आशिर्वाद घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे कितीही संकटे आली तरीही मार्ग काढला आणि विकास केला.
परवाच्या पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. 2005 मध्ये प्रति घरटे 5 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात होती. यात भरीव मदत करण्याचा शासन निश्चित विचार करेल असे त्यांनी सांगितले. पुरामुळे जे रस्ते खराब झाले आहेत. त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर समृध्दी महामार्ग 24 जिल्हयांसाठी विकासावर परिणाम करणारा आहे. हा महामार्ग गेमचेंजर म्हणून ओळख देईल. बदलापूर येथील पुरग्रस्तांसाठी भरीव मदत करावी अशी त्यांनी मागणी केली.
आ.किसन कथोरे यांनी या भागातील माळशेज घाटाला चीनच्या धर्तीवर काचेचा स्कायवॉकसाठी मंजूरी मिळावी, अशी मागणी केली. या भागातल्या रस्त्यांसाठी शासनाने जी भरीव मदत केली, त्याबद्दल त्यांनी आभार मानले.
 मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते एस.टी.स्टॅण्डचे भुमिपुजन, धान्याच्या गोदामाचेही भुमिपुजन आणि म्हसा येथील महाविद्यालयाचेही ई-भुमिपुजन करण्यात आले.
या कार्यक्रमास पाऊस असूनही पंचक्रोशीतील जनतेने मोठी गर्दी केली होती.
-----------



Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न