महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश

   ठाणे, दि. २७ ; वांगणी जवळ चामटोली परिसरात महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर पहाटेपासून सर्व संबंधित यंत्रणांनी तत्परतेने मदत कार्य करून प्रवाशांना प्रथम सह्याद्री मंगल कार्यालयात सुरक्षित हलविले. याठिकाणी प्रवाशांच्या जेवणाची तसेच 37 डॉक्टर्सच्या टीमद्वारे वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात येऊन त्यानंतर त्यांना 14 एसटी बसेस आणि तीन टेम्पो च्या माध्यमातून बदलापूर स्थानकावर पोहोचवण्यात आले. तेथून पुढे त्यांच्या इच्छित स्थळी प्रवासाची व्यवस्था रेल्वेमार्फत करण्यात आली.
            पहाटे सहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या तत्काळ मदत कार्यावर देखरेख ठेवण्याच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आणि संबंधित प्रांत अधिकारी, तहसीलदार, एनडीआरएफ, आरपीएफ, स्थानिक पोलिस, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नेव्ही, अग्निशमन दल आदी यंत्रणांच्या सहकार्याने या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी स्वतः या मोहिमेवर देखरेख करीत होते.
            या रेल्वेत सुमारे एक हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये नऊ गरोदर महिलांचा सुद्धा समावेश होता. 37 डॉक्टरांसह रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात स्त्रीरोगतज्ञांचाही समावेश होता. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली. एका गरोदर महिलेला निकड लक्षात घेऊन जवळच सुश्रुत रुग्णालयात  दाखल करण्यात आले. प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी 14 बसेस आणि 3 टेम्पोची व्यवस्था करण्यात आली. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी कुठल्याही स्थितीत घाबरू नये, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, हवाईदल, स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन, पोलिस अशा सर्व संस्था आपल्या मदतीसाठी आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना दिली जात होती. स्थानिक रहिवाशांनी देखील या मदत कार्यात सहभाग घेतला.
            पहाटे या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी मुंबईतील तीन आणि पुण्यातील दोन अशा पाच एनडीआरएफ टीमना मदतीसाठी पाचारण केले. तर ठाणे येथील महापालिकेची एक टीम या मदतकार्यात सहभागी झाली. प्रवाशांना हवाईमार्गे बाहेर काढण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हेलिकॉप्टरला देखील बोलावण्यात आले. संपूर्ण यंत्रणांनी मिळून तत्परतेने मदतकार्य केल्याने सर्व प्रवाशांना दुपारी दोनच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट
            या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला मदत कार्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांनी मदत कार्याची स्वतः पाहणी केली. प्रवाशांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले जाईल, त्यांनी काळजी करू नये, असे सांगून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला.
-ooo-


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न