ग्राहकांचे हित जपावे -राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे
अध्यक्ष अरूण देशपांडे यांचे आवाहन 
 ठाणे दि.30(जिमाका): ग्राहकांचे हित जपणे हे सेवा देणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या टोल फ्री  क्रमांकावर तक्रार दाखल करावी आणि शासनाच्या संबंधित विभागांनी त्याची तात्काळ दखल घेऊन तक्रार निवारण करावे, अशी सूचना राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्रीस्तरीय अरूण देशपांडे यांनी केली.
            राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीने ग्राहकांना सेवा पुरविणाऱ्या ठाणे  जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय समिती  सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी  जलसिंग वळवी, उप नियंत्रण शिधा वाटप फ परिमंडळ नरेश वंजारी  आदी यावेळी उपस्थित होते.
            श्री.देशपांडे म्हणाले, नागरीकांची अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित तक्रार असल्यास विभागाने 1800222365 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर या दोन्ही विभागांशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवता येते. त्यावर 72 तासात झालेल्या कार्यवाहीबाबत संदेश दिला जातो. त्याचबरोबर वजन व मापे या विभागाशी संबंधित काही तक्रार असल्यास ती 9869691666 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर अथवा 022-22622022 या क्रमांकावर नोंदविता येईल. विजेशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास महावितरणने देखील ग्राहकांसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध करून दिली असून 18002333435 या क्रमांकांवर ग्राहकाला आपली तक्रार नोंदविता येऊ शकेल. यावर एक टोकन क्रमांक दिला जातो.
            ग्राहकांना सेवा देणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ग्राहकांच्या दृष्टीने आवश्यक आणि गरजेच्या असणाऱ्या बाबींचा फल्क लावावा, असे श्री.देशपांडे यांनी सांगितले. आवेष्टित वस्तुंवर उत्पादकाचे नाव व पत्ता, वस्तूचे नाव, वजन, किंमत, उत्पादनाची तारीख, तक्रार कोठे करावी आदी बाबी असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ग्राहकांना असलेल्या अधिकारांमध्ये सुरक्षिततेचा अधिकार महत्त्वाचा असून त्यादृष्टीने शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी ग्राहकांच्या तक्रारींची जबाबदारीने  दखल घ्यावी, असे आवाहन करून ग्राहकांनी आपली तक्रार आपले सरकार पोर्टलवर दिल्यास त्याची देखील अवश्य दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
०००००


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न