प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन




ठाणे दि. 23- अल्प व अत्यल्प भुधारक पात्र शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपुर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3000 रूपये मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी केले आहे.
राज्याचे  कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच  त्यांनी गावस्तरावर दि .23 ते 25 ऑगस्ट या कालावधीत प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबीरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. या योजनेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी कोकण विभाग विभागीय कृषी सह संचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक महेंद्र सावंत, तहसिलदार (सामान्य प्रशासन) राज तवटे, कृषी सहाय्यक राजेश देवरुखकर आदि सहभागी होते.
योजनेची वैशिष्ट्ये :
या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार 55 ते रु. 200 रूपये प्रती माह मासिक हप्ता वयाचे 60 वर्षे पुर्ण होईपर्यत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्याइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती/ पत्नी स्वतंत्रपणे योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची 60 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे रु. 3000/- मासिक पेन्शन मिळणार आहे.
ज्या पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांनी योजनेमध्ये भाग घेतलेला असून काही कारणामुळे त्यांना योजनेतून बाहेर पडावयाचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह त्यांना परत करण्यात येईल. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्याचे सेवानिवृत्ती तारखेपुर्वी (म्हणजेच वय 60 वर्षे होण्यापुर्वी) आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे 60 वर्षे वयापर्यंतचे उर्वरीत मासिक हप्ते पती/ पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करुन त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या पती/पत्नी शेतकऱ्याचे पेन्शन खाते बंद करावयाचे असल्यास त्या पती/ पत्नी शेतकऱ्याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदार पती/ पत्नी शेतकऱ्यास मिळेल.
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी पी.एम.किसान योजनेच्या लाभातून शेतकऱ्याच्या सहमतीने प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अंशदायी हप्ता रक्कम कपात करण्यात येईल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र (CSC - Common Service Centre) मार्फत https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून सदर नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रु. ३०/- (प्रती शेतकरी) सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे (आधारकार्ड, बँक पासबूक, मोबाईल नंबर इ.) सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी) द्वारा प्रबंधित (Managed) पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न