राज्यस्तरीय वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे सोमवारी ठाण्यात उद्घाटन
ठाणे, दि. २४- राज्यातील आदिवासी, ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना विशेष तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करून त्यांना योग्य सेवा मिळाव्यात, या हेतुने राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात राज्यातील 16 जिल्ह्यांचा समावेश असून या शिबीराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सोमवार 26 ऑगस्ट 2019 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी आरोग्य तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय देशमुख, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील ग्रामीण भागातील आदीवासी पाड्यावर राहणार्या नागरीकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत शासनाच्यावतीने वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिर 26ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2019 या कालावधीत जिल्हा स्तरावर राबविण्यात येत आहे. यावेळी 14 प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक असणार असून फिजिशियन, सर्जन देखिल असणार आहेत. या शिबिरात रुग्णांची विशेष तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार योग्य त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment