परिवहन विभागाची नाळ सर्वसामान्यांशी जोडलेली- परिवहन मंत्री दिवाकर रावते
ठाणे, दि. 27- परिवहन विभागाचा प्रत्येक घराशी संबंध असतो. आज प्रत्येक
घरातील व्यक्ती आपल्या दळणवळणाच्या गरजा भागविताना परिवहन विभागाच्या वाहनाचा वापर
करतो. त्यामुळे परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे, असे
प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. सामान्य माणसाला या विभागापासुन
रोजगार उपलब्ध होतो असे सांगून यापुढे नागरिकांची सर्व कामे ऑनलाईन होतील अशी
व्यवस्था करण्यात आल्याने नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचे ते म्हणाले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण वाडेघर (उंबर्डे)
येथील नूतन इमारतीचे भूमीपूजन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते संपन्न
झाले. यावेळी कल्याण पश्चिम मतदार संघाचे आमदार नरेंद्र पवार, कल्याण डोंबिवली
महानगर पालिकेच्या महापौर विनीता राणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र गायकवाड, उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे उपस्थित होते.
वांगणी जवळ
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या
महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांना इच्छीत ठिकाणी सुखरुप पोचवण्यासाठी एस.टी. व
केडीएमसी च्या चालक व वाहक तसेच अधिकारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
याबद्दल श्री.रावते यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना याप्रसंगी गौरविण्यात
आले.
आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण शहरातील समस्यांचा उल्लेख
करून परिवहन मंत्री या समस्या निश्चित सोडवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास परिवहन विभाग तसेच केडीएमसीचे कर्मचारी,
अधिकारी, रिक्षा चालक, मालक, कल्याण मधील नागरिक उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment