वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे राज्यस्तरीय उद्घाटन महाआरोग्य शिबीरांद्वारे उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांवर भर -आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 26- एखाद्या
रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने भर
दिला आहे. त्यासाठी राज्यात आता महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. राज्यातील
प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने ‘संकल्प
निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद घेऊन समाजातील प्रत्येक
घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे, असे
आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असलेल्या महाआरोग्य
शिबिराचा राज्यस्तरीय शुभारंभ ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात झाला. त्यावेळी
ते बोलत होते. आरोग्यमंत्री श्री. शिंदे व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे
यांच्या हस्ते या शिबिरांचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी
ठाण्याच्या महापौर श्रीमती मिनाक्षी शिंदे, खासदार
डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, पांडुरंग बरोरा, विलास तरे, आरोग्य
विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आयुक्त डॉ.अनुप कुमार,
आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यावर अधिक लक्ष केंद्रीत
करण्यात येत आहे. 16 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे शिबिर
आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आबालवृद्धांच्या सर्व आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. आरोग्य
विभाग सातत्याने शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करीत असून यासाठी
नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. राज्यात 1100 आरोग्य
वर्धिनी केंद्र सध्या सुरू असून 5200 उपकेंद्रांचे रूपांतर
आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये केले जाणार आहे. डायलिसीसची सुविधा, कर्करोगाची तपासणी, टेलिमेडिसीन अशा सुविधा देखील
प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण
झालेल्या पूर परिस्थितीत तसेच त्यानंतर आरोग्य विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने उत्तम
समन्वयाने सामुहिक प्रयत्नातून चांगली आरोग्य सेवा दिल्याबद्दल श्री.शिंदे यांनी
कौतुक केले. यामुळे पूर ओसल्यानंतर संभाव्य साथीचे आजार रोखणे शक्य झाल्याचे
त्यांनी सांगितले.
श्री.ठाकरे यांच्या हस्ते 16 जिल्ह्यांतील
महाआरोग्य शिबिरांच्या उद्घाटनाबरोबरच गडचिरोली जिल्हा रूग्णालयातील सीटी स्कॅन
सेंटरचे देखील ई-उद्घाटन करण्यात आले. महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेल्या
विविध जिल्ह्यांमध्ये मान्यवरांनी यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
यावेळी बोलताना श्री.ठाकरे यांनी संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य
तपासणी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यासाठी केंद्र, राज्य
सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात,
यांचा नागरिकांना लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. घरोघरी आरोग्य सेवा पुरविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांची
प्रशंसा करून पूर परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामाबद्दलही त्यांनी
धन्यवाद दिले.
प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी आरोग्याच्या अनेक क्षेत्रात
महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असून जेथे सुधारणा आवश्यक आहे ती करण्याचा प्रयत्न
केला जात असल्याचे सांगितले. ज्या जिल्ह्यात जे आजार आढळतात त्या गरजेनुसार नियमित
आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आदिवासी आणि दुर्गम भागात
विशेष लक्ष केंद्रीत केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी कायाकल्प कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या
उपजिल्हा रूग्णालय, शहापूर, स्त्री रूग्णालय उल्हासनगर, ग्रामीण रूग्णालय
बदलापूर आणि ग्रामीण रूग्णालय टोकावडे यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000
Comments
Post a Comment