महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा येणे आवश्यक --- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी



ठाणे  दि. १५ : महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यामध्ये सांस्कृतिक आदान प्रदान व एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणं फारसं अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा  शिका असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज नवी मुंबईत केले.
वाशी येथे उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे  लोकार्पण राज्यपाल  श्री कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासी मंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक , मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 

उत्तराखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी राज्यशासनाशी चर्चा करणार असल्याचे सांगून श्री कोश्यारी म्हणाले पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गाव तेथे रस्ता झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत. आज रस्त्यांचे संपूर्ण देशात जाळे तयार झाले असून सगळी राज्ये एकमेकांशी जोडली गेली आहेत. म्हणूनच लोक श्री गडकरी यांना सडककरी म्हणू लागले आहेत.

मुंबई देशाची  आर्थिक राजधानी आहे. यथे वास्तव्य करताना आपल्या मुळ राज्याला, प्रांताला विसरू नका. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या मुळ गावांना अवश्य भेटी द्या असे आवाहन श्री कोश्यारी यांनी केले.

उत्तराखंड राज्यात अॅडव्हेंचर टूरिझम विकसित  करणार असून १२०० करोड रुपये खर्च करून टेहरी पर्यटनस्थळ  विकसित करण्यात येत असल्याचे सांगून  मुख्यमंत्री  श्री रावत यांनी उत्तराखंड राज्यात शासनाच्यावतीने  राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी  या भवनात कार्यालय बनवणार असल्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौर जयवंत सुतार यांनी उत्तराखंड शासनाला सर्वोतपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार गणेश नाईक , आमदार मंदा म्हात्रे यांची यथोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास उत्तराखंड राज्याचे मूळ रहिवासी असलेले परंतु मुंबई मध्ये कार्यरत असलेले अधिकारी, चित्रपट कलावंत यांसह नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न