ठाणे जिल्ह्यात शिवभोजन योजनेचा शुभारंभ गरजू व्यक्ती पर्यंत शिवभोजन पोहचविणार -पालकमंत्री शिंदे



ठाणे , दि. 26 जानेवारी :  जिल्ह्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केले. 
 संतोषी माता महिला बचतगट यशोधननगर आणि   लक्ष्मी कँटरर्स लोकमान्य नगर येथे  शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आला.
           राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली  आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात सात ठिकाणी     शिवभोजन केंद्राचा  प्रारंभ झाला आहे.  गरीब, गरजू जनतेला सवलतीच्या दरात फक्त 10 रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन  पालकमंत्री श्री. शिंदे  यांनी केले .
            शिवभोजन या योजनेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली असून शिवभोजन करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र या ॲपव्दारे काढण्यात येईल यामुळे या योजनेत पारदर्शकता येणार आहे. 
                 राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या ताटा मागे अर्थात प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये रुपये 50 तर ग्रामीण भागामध्ये रुपये 35 असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांकडून केवळ 10 रुपये रक्कम घेतली जात असली तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये 50 रुपये व ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असणार आहे. दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा  पालकमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.
        जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच या भोजनालयातून शिव भोजन थाळी मिळणार आहे. शिव भोजन थाळी अंतर्गत प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न