सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर



ठाणे , दि. 17(जिमाका): ठाणे जिल्ह्यात  कोरोना ‍विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रभावी  उपाययोजना व जनजागृती करीत आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.  सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन ठाणे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक असेल तरच प्रवास करावा.  खासगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम संकल्पनेनुसार परावानगी देण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी मिशनमोडवर काम सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्च पर्यंत रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही. तसेच रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत संबधित विभागाला सूचना दिल्या आहेत. याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेऊन रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी दिले आहेत. 
सर्व सार्वजनिक समारंभ, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विवाह समारंभ नियोजित असल्यास मोठा समारंभ टाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह साजरा करावा गर्दी टाळावी. कोरोना संसर्गाबाबत अनेक अफवा समाज माध्यमांवरुन पसरत आहे, अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.  प्रत्येकानी आपल्या स्वच्छतेची काळजी स्वत:च घेतली पाहिजे स्वच्छतेच्या जोरावर या संसर्गापासून दूर राहता येईल. घाबरू नका काळजी घ्या. जनतेने या विषयाचं गांभीर्य लक्षात घेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न