घाबरू नका पण सतर्क रहा ---जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर


           


ठाणे , दि.6जिमाका :    ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही तसेच एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही.  या विषाणूचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पुरेशी खबरदारी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर  आयोजन करणे टाळा. घाबरू नका पण सतर्क रहा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.  

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील मेडिकल असोसिअशनचे पदाधिकारी यांची  संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही  आणि उपाययोजनांबाबतचा आढावा घेतला.

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन  सज्ज असून जिल्हा रुग्णालये, जिल्हापरिषद आरोग्य विभाग, तसेच महानगर पालिकांच्या  आरोग्य विभागांच्या वतीने सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये  १० खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. संशयित रुग्ण आढळ्यास त्यावर करावयाच्या उपचारांबाबत तसेच उपाययोजनाबाबत सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर व संबधितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हि औषधे रास्त दरात उपलब्ध होतील याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वाजवी पेक्षा जास्त दराने आकारणी आढळून आल्यास त्या व्यावसायिकाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरीकांनी विनाकारण मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ट अंतरावरुनच इतरांशी संवाद साधावा, खोकताना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. तसेच समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्याचे टाळावे असे आवाहन श्री नार्वेकर यांनी  केले आहे.  

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  पर्यटक /प्रवाशाकडून वैद्यकीय मदतीची मागणी झाल्यास तात्काळ जिल्हा आरोग्य यंत्रणेस कळविण्याबाबतच्या सूचना  हॉटेल,लॉज व्यावसायिकांना देखील देण्यात आल्या आहेत.

लोकांच्या मनात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात तसेच राज्यात करोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नये तर काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न