क्वारंटाइन सेंटरमधील रहिवाशांची गैरसोय खपवून घेणार नाही - पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि 29 :- करोनाविरोधातील
मुकाबल्यात आपण सर्वच एकदिलाने काम करत आहोत. करोनाबाधित व्यक्तींच्या
संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या संशयित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटर्सही
मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मात्र, या ठिकाणी दाखल केलेल्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी ठाणे महापालिकेने घ्यायची आहे. याबाबतच्या
तक्रारी खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
करोनाविरोधातील लढाईत श्री. शिंदे स्वत: रस्त्यावर उतरून प्रशासकीय यंत्रणेचे नेतृत्व
करत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:
पीपीई किट घालून जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात जाऊन करोनाबाधित
रुग्णांशी संवाद साधला होता. श्री. शिंदे
यांच्या या एका कृतीमुळे प्रशासकीय यंत्रणा तसेच करोनाबाधित रुग्णांमध्येही नवी उमेद
निर्माण होऊन करोनाविरोधातील लढाई अधिक तीव्र झाली आहे. कोव्हिड
रुग्णालये व क्वारंटाइन सेंटर येथील रुग्ण व संशयितांना उत्तम आहार मिळणे, तेथील बेड, गाद्या, उश्या,
चादरी यांची व्यवस्था, औषधे व स्वच्छता साहित्याची
उपलब्धता, रुग्णवाहिकांची उपलब्धता यावर श्री. शिंदे स्वत: सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
त्यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत
घोडबंदर रोड येथील होरायझन स्कूलमधील क्वारंटाइन केंद्राला भेट दिली. क्वारंटाइन केंद्रात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या
जेवणाची त्यांनी पाहाणी केली. त्यानंतर ध्वनीक्षेपकाद्वारे त्यांनी
तेथे विलगीकरण करण्यात आलेल्यांशी संवाद साधून त्यांना भेडसावत असलेल्या अडचणींची माहिती
घेतली. विलगीकरण केलेल्या नागरिकांची जबाबदारी पालिकेची असून
तुम्हाला कुठलाही त्रास जाणवू नये, यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील
आहे. काहीही अडचण जाणवत असल्यास नि:संकोच
सांगा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
स्वत: पालकमंत्र्यांनी संवाद साधल्यामुळे येथील
रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले.
येथील रहिवाशांच्या अडचणी जाणून
घेतल्यानंतर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी जेवण आणि औषधांबाबतच्या
तक्रारी तातडीने दूर करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. क्वारंटाइन सेंटरमध्ये अतिजोखमीचे संशयित रुग्ण ठेवण्यात येत असून त्यांची
कुठलीही आबाळ होता कामा नये, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल
करण्यात आलेले श्री. सुनील केदार या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या
पत्नीला न्यूमोनिया झाल्यामुळे अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,
कुटुंबियांची काळजी वाटत असल्याचे श्री. शिंदे
यांना सांगितले. त्यावर श्री. शिंदे यांनी
तात्काळ संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी दूरध्वनीवरूनच चर्चा करून श्रीमती केदार यांच्या
प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचारात काहीही कमी पडू न देण्याच्या सूचना केल्या.
याप्रसंगी श्री. शिंदे यांच्या समवेत नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर,
महापालिका अधिकारी अशोक बुरपुल्ले आदी उपस्थित होते.
होरायझन येथील क्वारंटाइन सेंटरच्या
पाहणीनंतर श्री. शिंदे यांनी तीन हात नाका येथील गुरुद्वारा येथे शीख
बांधवांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कम्युनिटी किचनचीही पाहणी केली. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून शीख बांधव करत असलेल्या मदतीबद्दल श्री.
शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment