नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू ​ - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य

दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू

- कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई दि. १४: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या  खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले आहेत.

    सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापी, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ