ठाणे दि.2 (जिमाका): कृषि विज्ञान केंद्र बारामती व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने
विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळवण्यासाठी खत बचतीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी आपल्या अँड्रॉईड मोबाईल फोन मधील गूगल प्ले-स्टोअर मध्ये 'Krushik/ कृषिक' सर्च करुन अथवा खालील QR कोड स्कॅन करुन प्रथम 'कृषिक' ॲप डाऊनलोड करा.
रासायनिक खतांचा कमीत-कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकांसाठी अचूक व फायदेशीर खत मात्रा निवडणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन जमिनीची सुपिकता वाढीस लागून अधिक उत्पन्न आपल्या हाती येईल.
ही अचूक खत मात्रा मिळविण्यासाठी फार क्लिस्ट गणिती सुत्रांचा वापर करावा लागतो. यासाठी शेतकरी मित्रांना या खत मात्रा अगदी सहज सुलभ पध्दतीने कशा मिळविता येतील हे लक्षात घेऊन कृषिक-खत गणकयंत्र विकसीत करण्यात आलेले आहे.
'कृषिक' ॲप - खत गणकयंत्रामधील वैशिष्टये : संबंधित कृषि विद्यापीठाच्या पिकनिहाय खत शिफारशींचा समावेश,जमिन आरोग्य पत्रिका आधारीत विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा,बाजारातील किंमतीनुसार प्रति एकर आवश्यक खतमात्रांच्या खर्चाची गणना,पिकांसाठी शिफारस केलेल्या खतमात्रेचे नत्र, स्फुरद व पालाश वापरासाठी विविध खतांचे पर्याय,शिफारस केलेल्या खतांच्या विभाजीत (स्प्लीट) मात्रांची गणना,सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय उपलब्ध,गावनिहाय जमिन सुपिकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना हि वैशिष्टये आहेत.
आपण कृषिक गणकयंत्राच्या माध्यमातून संबंधित कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा परिगणीत करण्यासाठी या मोबाईल अॅपचा आवश्य वापर करा. त्याप्रमाणे खतांचा फायदेशीर पर्याय (संयोजन) निवडा आणि भरघोस उत्पन्न मिळवा असे आवाहन
कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment