जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर रब्बी पिकांसाठी एकेरी मुलद्रव्ये असलेली खते वापरून खर्चात बचत करावी- कृषी विभाग
ठाणे,
दि. २३ (जिमाका): जमीन आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार (सायकल) ठाणे जिल्ह्याची
सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळेमार्फत
जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात आले असून
शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी एकेरी मुलद्रव्ये असलेली खते वापरून प्रति एकरी खर्चात
बचत करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार ठाणे जिल्ह्याचा
सुपिकता निर्देशांक पातळी नत्र-कमी, स्फुरद- मध्येम आणि पालाश- मध्यम असा आहे. त्यानुसार
हरभरा, भुईमूग आणि रब्बी उन्हाळी भात पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी या सुपिकता निर्देशांकानुसार
खतांचा वापर करण्यासाठी जिल्हा मृदा चाचणी प्रयोगशाळेमार्फत प्रत्येक ग्रामपंचायीतमधील
सुपिकता निर्देशांक फलकावर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ही
माहिती असून बाजारात उपलब्ध असलेल्या संतुलित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्यायांचा
वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.
कृषी
विभागामार्फत शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पिकांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मात्रांसाठी
खतांचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यामधे एकेरी मुलद्रव्ये कोणते असावे आणि संयुक्त
खते यांची माहिती देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एकेरी मुलद्रव्ये
असलेली साधी खते वापरावीत जेणे करून प्रति एकरी खर्चात बचत होईल, असे श्री. माने यांनी
सांगितले.
जिल्ह्यात
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा पिकाचे ९३८ हेक्टर तर भुईमूग पिकाचे १६२
हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. खतांच्या संतुलित वापरासाठी
शेतकऱ्यांनी माती परिक्षण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment