ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक
ओमायक्रॉनचा
धोका टाळण्यासाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक
लसीकरण
वाढविण्यासाठी कॉल सेंटर्स,सायंकाळचे सत्र सुरू करणार
- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे दि. १६ (जिमाका) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या जिल्हास्तरीय
कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली
आज झाली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी यावेळी
चर्चा व्यक्त करण्यात आली. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी
यंत्रणेला दिले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना भांडे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे आदि यावेळी उपस्थित होते.
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरीता प्राथमिक
आरोग्य केंद्र आणि तालुकास्तरावर कॉल सेंटर सुरु करण्याचा. विद्यार्थ्यांच्या
माध्यमातून प्रभात फेरी काढून लसीकरणासाठी आवाहन करतानाच काही तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी संध्याकाळचे लसीकरण सत्र
आयोजित निर्णय यावेळी घेण्यात आला.
ठाणे जिल्ह्यामध्ये १४ डिसेंबर अखेरीस ६१ लाख
२७ हजार ६७३ (८३.४४ टक्के) नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस
घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४१ लाख ५० हजार ६७७ (५६.५२ टक्के) आहे. राज्याच्या
लसीकरणाच्या तुलनेत पहिला डोस न घेणाऱ्या नागरिकांची संख्या ठाणे जिल्ह्यात
सर्वाधिक असून या नागरिकांच्या लसीकरणासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दीड लाख
नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांचे लसीकरण तातडीने होण्याकरीता प्राथमिक
आरोग्य केंद्रावर तसेच तालुक्याच्या ठिकाणी कॉल सेंटर सुरु करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिले. महापालिकांनी देखील अशा स्वरुपाचे
कॉल सेंटर सुरु करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यातील शासनाच्या
विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण
झाले आहे याची खातरजमा करावी. ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्या आहेत. अशा वेळी
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या लसीकरणाविषयी माहिती
घ्यावी आणि पालकांना लस घेण्याबाबत आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करावे. लसीकरणात सहभाग वाढावा याच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
काढावी, असेही श्री.नार्वेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासकीय
यंत्रणा भरीव प्रयत्न करत आहे. मात्र त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळण्याचे
प्रमाण अत्यल्प आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण गरजेचे असून प्रशासनाच्या
आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी लसीकरण पूर्ण करुन घ्यावे अन्यथा अन्य
जिल्ह्यांनी लस न घेणाऱ्यांसाठी जे निर्बंध लावले त्या प्रमाणे या जिल्ह्यातही
निर्णय घेण्याची वेळ आणू नये, नागरिकांनी लसीकरणाबाबत कुठलाही गैरसमज न बाळगता
स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सायंकाळचे लसीकरण सत्र
आयोजित करावे- डॉ. भाऊसाहेब दांगडे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
दांगडे यावेळी म्हणाले, गाव पातळीवर विविध यंत्रणांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी
एकत्रीत प्रयत्न करुन नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित करावे. शहापूर, मुरबाड या
तालुक्यांमध्ये काही ठिकाणी सायंकाळी सहा ते नऊ या वेळात लसीकरण सत्राचे आयोजन
करावे जेणे करुन नोकरी, व्यवसाय, कामा निमित्त घराबाहेर असणाऱ्या नागरिकांना
लसीकरणाची सोय होईल. लस वाहिन्यांद्वारे दुर्गम भागात नागरिकांना लसीकरणासाठी
अधिकाधिक प्रयत्न करावेत, असेही डॉ.दांगडे यांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्यातील ६५ गावांमध्ये १०० टक्के
लसीकरण झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेंघे यांनी सांगितले. गरोदर मातांचे
लसीकरणाचे प्रमाण वाढण्याकरीता दर बुधवारी त्यांच्यासाठी लसीकरणाचे सत्र आयोजित
करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दापूरमाळ सारख्या दुर्गम भागात जावून
नागरिकांचे लसीकरणासाठी प्रयत्न केलेल्या जिल्हा परषिदेच्या आरोग्य पथकाचे
जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत अभिनंदन केले. बैठकीस जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.अंजली
चौधरी, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ यांचे प्रतिनिधी, तालुका आरोग्य अधिकारी आणि
महापालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment