महा आवास अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 


महाआवास योजनेतून जिल्ह्यातील

गरजूंना दर्जेदार घरे मिळावीत

          - पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 6 (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू, गरिबांना नागरिकांना महा आवास अभियानातून चांगल्या दर्जाची घरे मिळावीत. तसेच या अभियनातील उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून महाआवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या महा आवास अभियान टप्पा 2 अंतर्गत ठाणे जिल्हास्तरीय कार्यशाळेच उद्घाटन पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुहास पवार, आमदार कुमार अयलानी, आमदार गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे, जिल्हा परिषदेच्या सभापती अनिता निरगुड यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री म्हणाले की, महाआवास अभियानात गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. यावर्षीही राज्य व केंद्र पुरस्कृत विविध आवास योजनांची उद्दिष्टे पूर्ण करून ठाणे जिल्ह्याला राज्यात आघाडीवर आणावे. आवास योजनांची घरकुलेही वेळेत व चांगल्या दर्जाची व्हायला हवीत. तसेच या योजनांचे निकष काटेकोरपणे पाळले जावीत. म्हाडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती व्हावी. युनिफाईड डीसीआरच्या माध्यमातून गृह निर्मितीला चालना मिळणार आहे.

            जिल्ह्यात एकही नवीन झोपडी होता कामा नये. अतिक्रमण होऊन शासकीय जमिनींवर कोणालाही ताबा घेता येऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात वेगाने नागरिकरण होत आहे. मुंबईवरील ओझे कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शासकीय जमिनी म्हाडाला दिल्यास मोठ्या प्रमाणावर गृहनिर्मिती होईल. सध्या दिवा, टिटवाळा येथे मोठ्या प्रमाणात घरकुलांची निर्मिती होत आहे. आदिवासी, अनुसूचित जातींसाठीच्या घरकुल योजना म्हाडा मार्फत राबविण्याचा विचार सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेने जागांचे मॅपिंग केल्यास झोपडपट्टी निर्माण होणार नाही.

श्रीमती पाटील यांनी अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची निर्मिती होईल व राज्यात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी, महा आवास अभियान राबवितांना जागांची कमतरता जाणून बहुमजली आवास बांधण्यात यावेत. तसेच योजनेतील लाभार्थ्यांना तत्काळ गृहकर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आवास योजनेतील साहित्य महिला बचतगटांकडून घ्यावेत, अशी सूचना केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी अभियानाच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न