कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ठाण्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी 85 लाखांचे अनुदान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करण्याचे कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन
ठाणे, दि. 21 (जिमाका) – कृषि विभागाच्या विविध योजना एकाच अर्जाद्वारे मिळावे, यासाठी शासनाने एकात्मिक संगणक प्रणाली राबविली आहे. महाडिबीटीच्या माध्यमातून योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येतो. कृषि यांत्रिकीकरण योजनेतून सन 2021-22 या वर्षात ठाणे जिल्ह्यातील 237 लाभार्थ्यांना शेती औजारे/यंत्रे खरेदीपोटी सुमारे 1 कोटी 85 लाख अनुदान देण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरुस्कृत कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी एकच संगणक प्रणाली विकसित केली आहे. यानुसार महाडिबीटी पोर्टलवरील शेतकरी योजना या सदरामध्ये एकच अर्ज करून या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. यांत्रिकीकरण योजनेत शासनाने काही बदल केले आहेत. त्यानुसार, ट्रॅक्टर चलित औजारांसाठी आरसी पुस्तक बंधनकारक केले आहे. तसेच ही औजारे खरेदी ही कॅशलेस पद्धतीने करावे लागणार आहे. पूर्वसंमती अपलोड केलेल्या कोटेशन व चाचणी अहवालप्रमाणेच औजारांची खरेदी करणे बंधन कारक आहे, यासह इतर बदल यामध्ये करण्यात आले आहेत.
ही यंत्रे मिळतील
यांत्रिकीकरण योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, रिपर, चाफ कटर, मिनी दाल मिल ही यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते.
लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होते. लॉटरीमध्ये ज्यांची निवड होईल, त्या लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे सूचना देण्यात येते. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन थेट खात्यावर अनुदानाची रक्कम अदा केली जाते.
जिल्ह्यातील 237 शेतकऱ्यांनी घेतला लाभ
गेल्या आर्थिक वर्षात सन 2021-22 मध्ये ठाणे जिल्ह्यातील 237 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये कृषि यांत्रिकरण उपअभियानात 92 शेतकऱ्यांना 82 लाख 24 रुपये अनुदान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरणमध्ये 94 लाभार्थी शेतकऱ्यांना 77.92 लाख अनुदान आणि राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी 51 शेतकऱ्यांना 24 लाख 58 हजार असे एकूण 1 कोटी 84 लाख 74 हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
कृषि यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना शेतीसाठीची यांत्रिक औजारे खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने कमीत कमी वेळेत लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment