भातसा धरणातून उद्या, 20 जुलै रोजी सकाळी पाणी सोडण्यात येणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ठाणे, दि. 19 (जिमाका) : भातसा धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य येवा वाढला आहे. त्यामुळे उद्या, दि. 20 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे 6215.44 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भातसा नदीकिनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिली आहे.
भातसा धरणात आज दु.12.30 वाजेपर्यंत 138.10 मीटर एवढी पाणी पातळी होती. धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात वाढत्या पावसामुळे आणखी संभाव्य येवा वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी उद्या दि. 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे 1 ते 5 क्रमांकाची वक्रद्वारे 0.50 मीटरने उघडण्यात येणार आहेत. यातून धरणातील 6215.44 क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे भातसा नगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे. त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व इतर गावांमध्ये प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना केली आहे. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Comments
Post a Comment