ठाणे जिल्ह्यात १३ ऑगस्टला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तीन राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १ लाख ५८ हजार ७०२ प्रकरणे निकाली
ठाणे, दि. २५ (जिमाका): ठाणे येथील जिल्हा सेवा प्राधिकरणामार्फत डिसेंबर, मार्च आणि मे या महिन्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात येईल. पक्षकारांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांनी केले आहे.
न्यायालयातील सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये दिवाणी दावे, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबिक कलहाची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, विद्युत महामंडळाची वसूली प्रकरणे, राज्य परिवहन महामंडळाची प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे इ. व फौजदारी तडजोडजन्य प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे (कलम १३८ एन. आय अॅक्ट) तसेच दाखलपूर्व प्रकरणे, दुरध्वनी देयक प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ इ. चा समावेश आहे.
ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित गेल्या तीन लोकअदालतींचा आढावा घेण्यात आला असून ११ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या लोकअदालतीत एकूण १ लाख २७ हजार ३५६ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये ७२६९ प्रलंबित तर १ लाख २० हजार ०८७ दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे. १२ मार्च २०२२ रोजी झालेल्या दुसऱ्या लोकअदालतीत एकूण २२ हजार ६७८ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये १० हजार ३८० प्रलंबित तर १२ हजार २९८ दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे. तर ०७ मे २०२२ रोजी झालेल्या तिसऱ्या लोकअदालतीत एकूण ८६६८ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये ७२०६ प्रलंबित तर १४६२ दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment