मुद्रांक शुल्काच्या दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 ठाणे, दि. 26 (जिमाका) :- नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दि. ३१ जुलै २०१२ रोजी संपत आहे. थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबंधी पक्षकारांना दि. ३१ मार्च २०२२ पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी

 अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधितांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता तात्काळ जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

            संबंधित पक्षकारांनी दि. ३१ जुलै २०२२ रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास या सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील ९०% सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर ५०% दंड भरावा लागेलअसे मुद्रांक विभागाने कळविले आहे.

योजनेचे संक्षिप्त स्वरूप

            महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३१, ३२ (अ), ३३, ३३(अ), ४६, ५३ (अ) व ५३ (अ) अन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात दि. ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांकरिता सदर माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही योजना ही दि. १ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत (८ महिने) कार्यान्वित राहणार आहे. ही माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत ९०% सुट मिळेल. १ ऑगस्ट २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास दंडाच्या रकमेत ५०% सुट मिळेल.

            योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर वर 8888007777 व ईमेल आयडी complaint@igrmaharashtra.gov.in  यावर संपर्क साधावाअसे सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधिक्षकांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न