काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांच्या 1 फेब्रुवारी 2025 पासून भाडेदरात वाढ सुरु
ठाणे,दि.29(जिमाका):- मोटार वाहन कायदा, 1988 कलम 68 अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे. या प्राधिकरणाची बैठक दि.23 जानेवारी 2025 रोजी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई व अपर परिवहन आयुक्त यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये पुढिलप्रमाणे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
1. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर वाढ.
काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने दि.10 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये श्री.बी.सी. खटुआ समितीची स्थापना केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत शासनाने दि.9 मार्च 2020 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
मा. खटुआ समितीच्या अहवालास शासनाने दि.9 मार्च 2020 रोजीच्या निर्णयाव्दारे मान्य केलेल्या काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सूत्रानुसार व वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर इत्यादी बाबी विचारात घेवून भाड्याची परिगणना केली जाते.
यापूर्वी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि.26 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीत काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर इत्यादी बाबी वाढ झाल्यामुळे प्राधिकरणाने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदरवाढ करण्याचा निर्णय घेतला.
अ. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी.रुपये 18.66/- वरून रुपये 20.66/-भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 28/- वरून रुपये 31/- भाडेदर असणार आहे.
ब. कुलकॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 26.71/- वरून रुपये 37.2/- (20% वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुलकॅबसाठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रुपये 40/- वरून रुपये 48/- (20% वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.
क. ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 15.33 वरून रुपये 17.14/- भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 23/- वरून रूपये 26/- भाडेदर असणार आहे.
हे भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील.
वरील भाडेदर सुधारणा दि.1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल.
जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेतील त्या ऑटोरिक्षा / टॅक्सींना ही भाडेवाढ लागू होईल.
भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दि.1 फेब्रुवारी 2025 पासून दि.30 एप्रिल 2025 पर्यंत करून घेणे आवश्यक राहील.
भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफकार्ड दि.30 एप्रिल 2025 पर्यंतच अनुज्ञेय राहील.
विहित मुदतीत भाडे मिटरचे रिकॅलीब्रेशन न केल्यास संबंधित काळी-पिवळी मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षा चालक / मालकास प्राधिकाऱ्याच्या दि.20 डिसेंबर 2021 रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र.22/2021 नुसार मुदत समाप्ती नंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबसाठी विभागीय दंडात्मक शुल्क आकरण्याचा निर्णय दि.1 मे 2025 पासून लागू होईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे रोहित काटकर यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment