कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे,दि.31(जिमाका):- मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार व महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा दि.28 जानेवारी 2025 रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महानगरपालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, म्हणी, वाकप्रचार स्पर्धा इतर महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेहराव मराठी भाषा स्पर्धा, लावणी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचबरोबर मराठी भाषेचे वैभव जपणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक झाड एक कविता, पथनाट्य, सोनावणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अक्षर दिंडी, मंगळागौर, प्रगती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्र असे बहारदार कार्यक्रम सादर केले.
हा कार्यक्रम बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ.नरेश चंद्र, उपआयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी केले.
00000
Comments
Post a Comment