पुढील 10 वर्षात ठाणे बनणार देशातील आदर्श शहर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे, दि.7(जिमाका):- ठाणे शहरात आणि जिल्ह्यात अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षात ठाणे शहर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श शहर बनणार यात शंकाच नाही, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे व्यक्त केला.
क्रेडाई एमसीएचआय ठाणे आयोजित 22 व्या रिअल
इस्टेट आणि हौसिंग फायनान्स एक्स्पो चे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या
हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे
महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल, क्रेडाई
चे अध्यक्ष जितेंद्र मेहता, डॉमनिक रोमेल, अजय आशर , स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप महाव्यवस्थापक
सुरजित त्रिपाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या
विकासात्मक प्रकल्पांसाठी सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. ठाणे शहराचा आणि
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच एकमेव ध्येय आहे. वाहतूक कोंडीचे वास्तव नाकारता येणार
नाही मात्र त्याबाबतीत लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहेत.
ते पुढे म्हणाले, गायमुख ते दहिसर मेट्रो, गायमुख
घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण,घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे, नागला बंदर
खाडी किनारा विकास प्रकल्प, मँग्रोव्ह पार्क अशी विविध कामे सुरु आहेत किंवा होणार
आहेत. पुढील दहा वर्षात ठाणे शहर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील एक विकसित आदर्श
शहर बनणार यात शंकाच नाही.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रेडाई चे अध्यक्ष
जितेंद्र मेहता यांनी केले. तसेच याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनोगत
व्यक्त करताना ठाणे जिल्ह्याच्या विकासात प्रशासनाचे योगदान याविषयी उपस्थितांना माहिती
दिली. तर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरु
असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.
त्याचबरोबर ठाणे शहरातील विकासात क्रेडाई एमसीएचआय ची भूमिका श्री.अजय आशर यांनी
विस्तृतपणे मांडली.
0000000
Comments
Post a Comment