“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारीच -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे,दि.24(जिमाका):- शासनाने खाजगी सावकाराच्या जाचातून शेतकऱ्याची मुक्तता करण्यात मह्तप्रयासाने यश मिळविले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यातील भागलपूर येथून “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण” संपन्न झाले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास तथा कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील एकूण 9 कोटी 80 लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 हजार कोटी निधी ऑनलाईन वितरीत करण्यात आला.
या दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यक्रमास ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, कृषी सहसंचालक अंकुश माने, कृषी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, कृषी विज्ञान केंद्र, मुरबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अभिषेक पवार कृषी उपसंचालक रावसाहेब जाधव, आणि योजनेचे लाभार्थी शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यावेळी श्री.शिनगारे बोलत होते.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याची यशस्वी अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यात होत असल्याचे समाधान आहे. शेतीची मशागत करण्यासाठी गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य मिळणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते. या योजनेमुळे ती गरज भागविली जाते, हीच या योजनेची खरी फलनिष्पत्ती आहे.
ते पुढे म्हणाले की, शासनाने खाजगी सावकाराच्या जाचातून शेतकऱ्याची मुक्तता करण्यात मह्तप्रयासाने यश मिळविले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारीच आहे. शासनातर्फे नाबार्डसारख्या बँकांमार्फत शेतकऱ्यांना अत्यल्प दराने कृषी पतपुरवठा केला जातो. शेतकरी उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांनी पूर्ण भाव ओतून शेतीचे काम करावे. शासन-प्रशासन आपल्यासाठी सदैव आपल्या सोबत आहे, असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेवून लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी सदैव तत्परतेने काम करीत आहेत आणि यापुढेही करीत राहतील. ई-केवायसी आणि आधार सीडींग ही मोहीम युद्धपातळीवर घ्यावी व जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेवू या.
यावेळी आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, योजनेची फलनिष्पत्ती तपासायची असेल तर शेतकऱ्याची आर्थिक उन्नती तपासणी गरजेचे आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कृषी योजनांच्या माध्यमातून व्हायला हवी. प्रशासन चांगले काम करीत आहे. जिल्ह्यात 14 कोटी 69 लाख अनुदान वितरित केले जाणार आहे. मागील वर्षी 77 हजार शेतकऱ्यांना लाभ दिला तर यावर्षी 73 हजार शेतकऱ्यांना लाभ देत आहोत. शेवटच्या शेतकरी लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी प्रशासनाने अधिक जागरूकतेने काम करावे, ही अपेक्षा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ठाणे जिल्ह्यात एकूण 80 हजार 65 ई-केवायसी लाभार्थी असून त्यातील 76 हजार 892 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर 3 हजार 764 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. बँक खाते अधार संलग्न करण्यांतर्गत एकूण 78 हजार 270 आधार ऑथेन्टिकेटेड लाभार्थी संख्या असून 77 हजार 181 बँक खाते आधार लिंक पूर्ण झाले आहे. तर 2 हजार 656 बँक खाते आधार लिंक करणे प्रलंबित आहे. भूमी अभिलेख नोंदी अंतर्गत एकूण लाभार्थी संख्या 79 हजार 837 असून 78 हजार 922 भूमी अभिलेख नोंदी अद्यावत झालेले लाभार्थी आहेत. तर 915 लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित आहेत.
या कार्यक्रमानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नागाव, मुरबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुरेश जगदाळे यांनी पशुसंवर्धन विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच “ॲग्रीस्टॅक” ओळखपत्राचेही वितरण करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 599 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून त्यापैकी 44 हजार 216 शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक ओळखपत्र तयार झाले आहेत.
या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केली. तर तंत्र अधिकारी मयुरी शेजोळ यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धनके यांनी केले.
00000
Comments
Post a Comment