सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी
ठाणे,दि.24(जिमाका):- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेंतर्गत रु.5 हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पीक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पीकाची नोंद आहे असे खातेदार, खरीप 2023 कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील Non digitalised villages मधील खरीप 2023 कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत.
पात्र शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत खातरजमा www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडून करुन घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पीक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांनी व चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील Non digitalised villages मधील खरीप 2023 कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. खरीप 2023 कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सर्व तलाठी/तहसिलदार/मा. जिल्हाधिकारी यांनी पात्र लाभार्थी याद्या दि.25 फेब्रुवारी 2025 पर्यंत कृषी विभागास सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी कृषी विभागाची राहणार नाही.
तरी वर नमूद केल्याप्रमाणे सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सर्व पात्र शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
तरी, अधिक माहितीसाठी नजिकच्या विभागीय कृषी सह संचालक/जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/ उपविभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी आयुक्तालय, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) र. शा. नाईकवाडी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment