मराठी ही आमची माऊली अभिजात भाषेची सावली
“माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके! परी अमृतातेंही पैंजा जिंके!”
प्रख्यात साहित्यिक पु. ल.देशपांडे
म्हणतात, "पंढरीचा पांडुरंग हे जसं महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत आहे, त्याप्रमाणेच
कुसुमाग्रज हे राज्याचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक ठेवा आहे". चला तर, माय मराठीच्या
संवर्धनासाठी तसेच मराठीपण व मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वजण एकदिलानं
कटिबद्ध होऊया.
1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची
निर्मिती झाली.महाराष्ट्र राजभाषा अधिनियम-1964 नुसार मराठी भाषा ही राजभाषा म्हणून
अमलात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजेच
2010 साली मराठी विभागाची मंत्रालयात निर्मिती करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व
प्रसार करणं, हे या विभागाचं मुख्य धोरण आहे. सदर धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी,
या उद्देशाने मराठी भाषा विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती
मंडळ हे विभाग कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा
गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन ह्या कार्यक्रमांचे आयोजन राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी
तनमनधनाने करत आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
भाषा हे संवादाचे माध्यम असून,
आपले विचार व अनुभवांना प्रगट करणारा सुयोग्य मार्ग आहे. त्याद्वारे आपल्या जीवनाची
जडणघडण होत असते. मराठी भाषेची थोरवी गातांना कविवर्य सुरेश भट म्हणतात, “आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते
मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी, जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी, धर्म -पंथ-जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय म्हणतो मराठी!”
वास्तविक पहाता, कुसुमाग्रज
हे माणसात माणूसपण रुजविण्यासाठी व त्याला निर्भय बनविण्यासाठी आपल्या काव्यपंक्तीत
सांगतात, गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तिरावरी नदीच्या, गवतातूनी उरावे याशिवाय किनारा,
समिधा, मराठी माती, हिमरेषा, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, स्वगत आदी कुसुमाग्रजांचे
काव्यसंग्रह मराठी क्षितिजावर खूप गाजले आहेत. ज्ञानेश्वरांनी तर मराठीला अमृताची उपमा
दिली आहे. “अमृतासारखी
वा त्याहूनही गोड असलेली माझी-तुमची माय मराठी माझा मऱ्हाठीचि बोलू कौतुके, परी अमृतातेंही
पैजा जिंके, ऐसी अक्षरें रजिकें, मेळवीन!”
कविवर्य कुसुमाग्रज हे माय
मराठीसमोर आदरानं नतमस्तक होतात. ते म्हणतात, मराठी भाषेच्या मस्तकावर राजमुकुट आहे,
पण तिच्या अंगावरची वस्त्रे मात्र फाटलेली आहेत. खरंतर, आपली विधिवत प्रतिष्ठापना होईल,
या आशेने ती मंत्रालयाच्या पायथ्याशी ताटकळत उभी आहे. या विधानाचा मराठी जनमानसाने
अवश्य विचार करून मराठीचा वारसा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध व्हावे.मराठीला
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही मराठी मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. अशावेळी देर मगर
दुरुस्त असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. महत्वाचं म्हणजे आपल्या राज्यात राहणाऱ्या अमराठी
नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना मराठी बोलण्यास प्रवृत्त करावे, जेणेकरून मराठी
भाषा गौरव दिन साजरा करणे सार्थक ठरेल.
राज्य शासनाच्या मराठी विभागाने
आता वेळ न दवडता, मराठी या राज्य भाषेवर होणारे इंग्रजी, हिंदी भाषांचे अतिक्रमण थांबविण्यासाठी
ठोस पावलं उचलावीत. त्याअनुषंगाने बालवयापासूनच मुला-मुलींचे शिक्षण आपल्या मातृभाषेत
व्हावं, या दृष्टीने मराठी माणसाने तनमनधनाने प्रयत्न करावेत.
तात्पर्य, माहिती तंत्रज्ञानाच्या
(आय.टी.) शिक्षणासाठी इंग्रजी येणं आवश्यक वाटत असलं तरी, मातृभाषेत लिहिणं-बोलण्यात
तरबेज असणं त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे, हे विसरता कामा नये. इंग्रजी भाषेचं ज्ञान
अवश्य घ्या. परंतु आपल्या मातृभाषेकडे पाठ फिरवू नका, एवढंच मराठी जनमानसाला प्रेमाचं
सांगणं आहे.
मराठी भाषेची अस्मिता अबाधित
ठेवण्यासाठी मराठी माध्यमाच्या शिक्षणावर अधिक भर देणं ही काळाची गरज आहे. मराठी असल्याचा
अन मराठी भाषेचा अभिमान बाळगून सकल मराठीजनांनी एकसंध होऊन मराठी चळवळ उभारावी, असे
आवाहन मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात येते. योगायोगाने मागील शिंदे सरकारच्या काळात
जय..जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. या गौरवपूर्ण गाण्याला राज्यगीताचा
दर्जा मिळाला, याचा प्रत्येक मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे.
राज्यातील मराठी जनमानसासह
सर्वधर्मीय लोकांनी माजी मुख्यमंत्री अन् आत्ताचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे
यांचे शतशः आभार मानले आहेत. कारण गतकाळात ना.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या
नेतृत्वाखालील महायुतीच्या कारकीर्दीत माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अखेर यश आलं. याबद्दल ना.एकनाथजी शिंदे यांना खूप
खूप धन्यवाद!
इतकेच नव्हे तर, माय मराठीला
अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह,
केंद्राचे सांस्कृतिक मंत्रालय अन् मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचेही मन:पूर्वक
आभार! आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिन च्या हार्दिक शुभेच्छा!
“माय मराठी चिरायू होवो!”
जय हिंद.. जय महाराष्ट्र!
लेखक - रणवीरसिंह
राजपूत, ठाणे,
निवृत्त जिल्हा
माहिती अधिकारी
00000
Comments
Post a Comment