विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

कॉपीमुक्त ठाणे करण्यासाठी विद्यार्थ्यांना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्राद्वारे आवाहन

 



ठाणे,दि.10(जिमाका):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इ.12 वी व इ. 10 वी परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात, यासाठी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांकरिता आपल्या आवाहनात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले आहेत की, तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्याची मानसिक तयारी करावी.

ते पुढे म्हणाले आहेत की, आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पुर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्याय्य मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात.

00000


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न