“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” “जनसामान्यांची सेवा हाच धर्म”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


ठाणे,दि.09(जिमाका):- हे शासन सर्वसामान्यांचे असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि जनसामान्यांची सेवा हाच धर्म या तत्वांवर चालणारे असून  नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            सार्वजनिक आरोग्य विभाग वतीने 6 डे-केअर किमोथेरपी सेंटर (ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व वर्धा) उभारण्यात येणार असल्याची घोषणा आणि कर्करोग मोबाईल व्हॅन-8, 102 रुग्णवाहिका-384, सीटी स्कॅन-2, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका-7, डिजिटल हँड हेड एक्स-रे मशिन-80 चा लोकार्पण सोहळा जिल्हा नियोजन भवन सभागृह, येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

             यावेळी आयुष मंत्रालय तसेच स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, नगरविकास विभागचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्री.नविन सोना, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी अभियानाचे संचालक डॉ.स्वप्नील लाळे, सुप्रसिध्द  अभिनेता तथा माजी खासदार गोविंदा, माजी मंत्री विजय शिवतारे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी  नेहमीच जनसामान्यांची सेवा हाच धर्म असे मानून काम करीत आलो आहे. आत्ताच खोपट बस डेपो येथे एसटी ड्रायव्हर व कंडक्टर यांच्यासाठी निर्माण केलेल्या उत्तम दर्जाच्या विश्रांतीगृहाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर जिथे एसटी डेपो तेथे कॅशलेस हॉस्पिटल ही संकल्पना संपूर्ण राज्यासाठी जाहीर केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात 700 पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे. महिलांचे कुटुंबाच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष असते, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे काहीही लक्ष नसते. आज आपण लोकार्पण केलेल्या या मोबाईल आरोग्य तपासणी यामुळे प्रत्येक गावागावातील महिलांची आरोग्य तपासणी करणे सहज साध्य होणार आहे. कॅन्सर संपविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जवळपास 51 हजार रुग्णांचे प्राण वाचवू शकलो. तब्बल 460 कोटी रुपयांचे सहाय्य आपण गरजू रुग्णांना करू शकलो, यापेक्षा मोठे समाधान नाही, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्या आयुष्यात बदल घडविणे, हेच या शासनाचे ध्येय आहे. समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. सर्वसामान्यांचे हे शासन असेच जोमाने काम करीत राहील. लवकरच "उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष" सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री.शिंदे यांनी यावेळी केली.

आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केले असून, जवळपास दोन कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. यासाठी शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत आधी दीड लाखापर्यंतची मदत केली जात होती. परंतु आता या शासनाने सरसकट सर्वांसाठी त्याची मर्यादा पाच लाखापर्यंत केली आहे. दुर्गम भागातील जनतेसाठीही हे शासन तत्परतेने काम करण्यास कटिबद्ध आहे.

कॅन्सर, टी.बी., हृदयरोग अशा आजारांचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात हृदयाला छिद्र असणाऱ्या 5 हजार 500 लहान बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या, हीच तर खरी पुण्याई आहे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही व्यवस्थेची महत्त्वाची दोन चाके आहेत. त्यांनी एकत्र मिळून जनतेच्या हिताची कामे करणे अपेक्षित आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगली कामे केली म्हणूनच शासन लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबवू शकले. त्यापैकीच एक शासन आपल्या दारी हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. संपूर्ण राज्यात पाच कोटी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले.  हे शासन गतिमान आणि लोकाभिमुख आहे आणि यापुढेही हे शासन अशाच प्रकारे काम करेल, असेही ते शेवटी म्हणाले.

आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांनी आपल्या मनोगतात उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की, राजकारणी सर्वसामान्यांसाठी काम करणारे असावेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहिले की याची खात्री पटते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आजपासून राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या  निदान व उपचार करण्यात येणार आहेत. हा सुरु करण्यात आलेला उपक्रम महाराष्ट्रातील तमाम मायमाऊलींसाठी समर्पित आहे. 

      यावेळी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील दरे गावात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून 70 कोटी निधी खर्चून नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील हरबल गार्डन उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच आयुर्वेदाचे महत्व प्रत्येक भारतीयाला कळण्यासाठी  हर घर आयुर्वेद”  या उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून मायका ॲपचे झाले लोकार्पण

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करणाऱ्या मायका या ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या अपॅचा लाभ सर्व वयोगटातील नागरिकांना होवू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरुन हे ॲप डाऊनलोड करता येवू शकते, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे यांनी दिली.

            या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्करोगतज्ञ डॉक्टरांचा, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या डॉक्टरांचा, दंतचिकित्सक तज्ञ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र फूड बास्केट चे वितरण क्षयरोग रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मृण्मयी भजक यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

             या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम

·        राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या  निदान व उपचार करण्यात येणार आहे.

·        राज्यात 8 ठिकाणी अकोला, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पुणे येथे कॅन्सर व्हॅन लोकार्पण सोहळा होणार आहे. या वाहनांमध्ये कर्करोग प्रतिबंधात्मक (Preventive Oncology) समुपदेशन, निदान व बायोप्सी या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. हे वाहन ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी कर्करोगासंबधी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्तरावर कर्करोग वाहनाचा दौरा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे.

·        नव्याने खरेदी केलेल्या 7 ALS ॲडव्हान्स लाईप सपोर्ट रुग्णवाहिका सद्य:स्थितीत आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या गडचिरोली-उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा, चंद्रपूर-उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, सिंधुदुर्ग-उपजिल्हा रुग्णालय कणकवळी, पुणे-उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर, रत्नागिरी-प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड, रायगड-ग्रामीण रुग्णालय महाड या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

·        सद्य:स्थितीत अकोला, नाशिक, अमरावती, सातारा, पुणे गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व बीड या 9  जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर (किमोथेरपी युनिट) ची स्थापना झालेली आहे.

·        राज्यात ठाणे सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व वर्धा या 6 जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचारासाठी किमोथेरपीची सुविधा नव्याने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅन्सर डे केअर किमोथेरपी सेंटर अंतर्गत प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारीका यांच्यामार्फत कॅन्सर रुग्णांना उत्कृष्ट दर्जाची किमोथेरपी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

·        उपजिल्हा रुग्णालय वैजापूर, छत्रपती संभाजीनगर व उपजिल्हा रुग्णालय डहाणू, जि.पालघर येथील सार्वजनिक खाजगी भागिदारीतून नव्याने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सीटी स्कॅन सुविधांचे लोकार्पण आज करण्यात आले.

·        राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शोधलेल्या संशयित क्षयरुग्णांच्या छातीचा एक्स-रे काढण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून राज्यातील 34 ग्रामीण जिल्हे, 22 महानगरपालिका व मुंबईच्या 24 वार्डासाठी राज्यस्तरावरुन आलेल्या 80 डिजिटल पोर्टेबल हँड एक्स-रे मशीनचे लोकार्पण आज करण्यात आले.

·        राज्यामध्ये 102 योजनेंतर्गत गरोदर माता व नवजात शिशुंना रुग्णालयात संदर्भित करण्यासाठी  384 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न