विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न

"मिशन 100 डेज" कार्यक्रमाकडे एक संधी म्हणून पाहावी - विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी


  ठाणे,दि.28(जिमाका):- सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात सौजन्याची वागणूक मिळावी. त्यासाठी विशेष लक्ष द्यावे. या "मिशन 100 डेज" कार्यक्रमाकडे एक संधी म्हणून पाहावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
      शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
     याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या विभाग/कार्यालयप्रमुखांची उपस्थिती होती.
  यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद हिवाळे व इतर अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कामांबाबतचे संगणकीय सादरीकरण केले.

     यावेळी विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, आदिवासींसाठी विशेषतः जन्मदाखला, आधारकार्ड अन्य विविध दाखले देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. सीएससी सेंटरवर टोकन सिस्टीम सुरू करावी. प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता करण्यात यावी.महिलांसाठी योग्य प्रसाधनगृह आवश्यक आहे, त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. शासकीय कामकाजाचे कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवावा. सर्वसामान्यांना कार्यालयात सौजन्याची वागणूक मिळावी. त्यासाठी विशेष लक्ष द्यावे. या "मिशन 100 डेज" कार्यक्रमाकडे एक संधी म्हणून पाहावी. त्यानिमित्ताने आपल्या कामकाजातील कमतरता पूर्ण करावी. आपण जनतेला जी सेवा देतो ती परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करावा. नाविन्यपूर्ण उपक्रम शोधावेत. लोकांसाठी शक्य ते करावे. चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करावा. लोकांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. कामात सुधारणा कराव्यात. कार्यालयात पूर्ण झोकून देऊन काम करावे.

    बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी विभागीय आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर "मिशन 100 डेज" याविषयीचे प्रास्ताविक केले. आणि शेवटी विभागीय आयुक्तांचे तसेच उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”