ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे कारागृहातील बंद्यांकरिता “जीवन गाणे गात जावे” सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
ठाणे,दि.26(जिमाका):- ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरिता सांस्कृतिक कार्य विभाग तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा व महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.सुहास वारके (भा.पो.से) व कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दि.25 मार्च 2025 रोजी कारागृहामध्ये दाखल बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या तसेच बंधांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या प्रयोधनात्मक स्वरूप असणाऱ्या “जीवन गाणे गातच जावे” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती राणी भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम संयोजक आर्यन देसाई, उपअधीक्षक श्री.डी.टी. डाबेराव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.के.पी. भवर उपस्थित होते.
“जीवन गाणे गात जावे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांना प्रेरणा देवून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज जीवनगाथेवर आधारित गीताने झाली. त्यानंतर राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या गाण्यांमधून थोर महापुरुषांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देण्यात आली व स्वावलंबन, शिक्षण, सामाजिक न्याय आणि आत्मपरिवर्तनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमात गायक निकेत इंगळे, विशाल कांबळे व श्रीमती सुदिक्षा पोटले या गायकांनी सुरेल आवाजात गीतांचे सादरीकरण करुन बंद्यांना मंत्रमुग्ध करुन मनोरंजन केले. कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेली “इतनी शक्ती हमें देना दाता”, “ए मेरे वतन के लोगो”, “हीच आमुची प्रार्थना”, “माणसाने माणसाचे माणसासारखे वागावे”, “दिल दिया है, जान भी देंगे”, “जीवन गाणे गात जावी टाकले” गीतांनी संपूर्ण कार्यक्रमाला एका सकारात्मक ऊर्जेने भारून टाकले.
सांस्कृतिक कार्यक्रमात मनोरंजनाबरोबरच निवेदक निकेत इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या कार्यातून बंद्यांचे समुपदेशन आणि प्रबोधनात्मक संदेशांद्वारे बंद्यांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरित करण्यात आले. गुन्हेगारीच्या मार्गावरून बाहेर पडून समाजात पुन्हा सन्मानाने जीवन जगण्याचा संदेश देत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
या विशेष उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि कारागृह प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. बंद्यांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला व या प्रेरणादायी कार्यक्रमाने त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
00000


Comments
Post a Comment