जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कुटुंब नियोजन आदर्श केंद्र संस्थेतर्फे महिलांकरीता आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ठाणे,दि.26(जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कुटुंब नियोजन आदर्श केंद्र संस्था (कनक), ठाणे यांच्या संमुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे येथे दि.25 मार्च 2025 रोजी महिला न्यायालयीन कर्मचारी व महिला विधीज्ञ यांच्याकरिता सर्विकल कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एन.ए. कंक, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-3 श्रीमती वसुधा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे श्री.एस के फोकमारे, 7वे सह दिवाणी न्यायाधीश, ठाणे श्री.ए.सी. डोईफोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, कुटुंब नियोजन आदर्श केंद्र संस्था ठाणे (कनक) तर्फे डॉ.श्वेतांबरी पडवळ व इतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका वर्ग तसेच जिल्हा न्यायालय, ठाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सर्व कर्मचारी, लिगल एड डिफेन्स कौन्सील सिस्टीमचे सर्व विधीज्ञ आदी उपस्थित होते.

कनक संस्था गेल्या 50 वर्षांपासून संपूर्ण भारत देशात कुटुंब नियोजन आदर्श केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य विषयावर कार्यरत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात महिला कुटुंब सांभाळताना त्यांची नोकरी देखील यशस्वीरित्या बजावत आहेत. परंतू या काळात त्यांच्याकडून त्यांच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयातील महिला न्यायिक अधिकारी, महिला अधिकारी-कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा न्यायालयाच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा जवळपास 50 न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

या प्रसंगी ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एन.ए. कंक यांनी उपस्थित महिलांना आरोग्यबाबत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष व हलगर्जीपणा न करता आपल्या आरोग्याप्रती सतर्क राहण्याबाबत आवाहन केले तसेच स्वत:साठी वेळ काढणे सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.

कनक संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेतांबरी पडवळ यांनी उपस्थित न्यायिक अधिकारी व कर्मचारी वर्गाला आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना सर्विकल कॅन्सर या आजाराबाबत जागृत राहण्याचे व वेळीच लक्षणे ओळखण्यासंदर्भात मोलाची माहिती दिली तसेच महिलांसाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे सातत्याने आयोजन केले गेले पाहिजे व महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे नमूद करून सर्व महिला कर्मचाऱ्यांना तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

शेवटी आभार प्रदर्शन करताना हे शिबिर महिलांच्या आरोग्याच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे असून सक्षम महिला तिच्या कामासोबत तिच्या घराची जबाबदारी सांभाळताना तिला उत्तम आरोग्यमान लाभले पाहिजे व त्यानुषंगाने या शिबिराचे आयोजन केले गेले व याअगोदर गेल्या वर्षी देखील ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासमवेत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी देवून डॉ.श्वेतांबरी पडवळ तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व परिचारिका वर्गाचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”