ठाणे जिल्ह्यात गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समस्या निवारण करण्याचे दिले आश्वासन

ठाणे, दि.12(जिमाका): ठाणे जिल्ह्यातील गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे आणि अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल 2025 रोजी अतिरिक्त अंबरनाथ, MIDC, आनंद नगर येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे होते.

या बैठकीत अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक संघटना, मुरबाड औद्योगिक संघटना, पुनधे शहापूर औद्योगिक संघटना, आसनगाव औद्योगिक संघटना आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख उद्योजक सहभागी झाले होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि शाश्वत विकासासाठी मानक कार्यप्रणालीची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी विविध औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आसनगाव येथे लवकरच अग्निशमन दल स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. तसेच, ठाणे जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणींसाठी वेळोवेळी सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली, ज्यामुळे जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी उद्योजकांच्या समस्यांचे खेळीमेळीच्या वातावरणात निराकरण केले. त्यांनी उद्योगांना औद्योगिक सुरक्षिततेसाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि ‘माझी सुरक्षा, माझी जबाबदारी’ हे सूत्र पाळण्याचे महत्त्व सांगितले. उद्योग आणि प्रशासनाने परस्परांच्या सहकार्याने काम करावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या संकेतस्थळावर उद्योग संबंधित तक्रारींसाठी नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीचे प्रास्ताविक करताना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील 7 कलमी कृती आराखड्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या अंतर्गत जिल्ह्यात 65 सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे सुमारे 4 हजार 896 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, ज्यामुळे जवळपास 68 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच, 2024 या वर्षामध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी 95 % करार पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. श्रीमती देवरे यांनी ठाणे जिल्ह्यातील 11 MIDC आणि जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण कसे केले जाते, याबद्दलचीही माहिती दिली. यासोबतच, MAITRI कायदा 2023 आणि MAITRI संकेतस्थळाद्वारे पुरविण्यात येणारी एक खिडकी योजनेची माहिती तसेच ठाणे जिल्ह्याचा विशेष प्रकल्प ‘ODOP – Millets’ ची सद्यःस्थिती आणि त्यासंबंधी उद्योजकांना मार्गदर्शन केले.

मुरबाड औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. उत्तमानी यांनी वाढत्या विजेच्या दरांबाबत आणि माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. शहापूर औद्योगिक संघटनेचे श्री. मनोज पाटील आणि TISSA औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधींनी शहापूरमधील उद्योजकांना अपुरा वीज आणि पाणीपुरवठा तसेच ESIC रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबद्दल अध्यक्षांचे लक्ष वेधले.

अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. उमेश तायडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ZUM बैठकीत मांडलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या समस्येचे निराकरण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, अतिरिक्त अंबरनाथ येथे 100 MVA चा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे आणि यासाठी त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्या महाव्यवस्थापकांचे आभार मानले. याव्यतिरिक्त, त्यांनी जमीन, पाणी, वीज, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने, पर्यावरणीय मंजुरी प्रमाणपत्रानुसार मालमत्ता कर आणि माथाडी कामगार कायद्यासंबंधी उद्योजकांच्या अडचणी आणि सद्यःस्थिती बैठकीत मांडली. इतर उद्योजकांनीही आपल्या समस्या व अडचणी बैठकीत व्यक्त केल्या.

शेवटी उपस्थित सर्व उद्योजक प्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासन उद्योग क्षेत्रासाठी घेत असलेल्या सकारात्मक धोरणात्मक निर्णयांबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे आभार मानले.

0000000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”