ठाणे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी धार्मिक नेत्यांचा पुढाकार

MSVT संस्थेचा उपक्रम यशस्वी

 

ठाणे,दि.28(जिमाका:- ठाणे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी MSVT संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः धार्मिक नेत्यांनी बालविवाहविरोधात सक्रिय भूमिका घेतल्याने या अभियानाला नवे बळ मिळाले आहे.

अक्षय्य तृतीया च्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या काळात बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, MSVT ने सर्व धर्मगुरूंना एकत्र आणत बालविवाह थांबवण्याचे आवाहन केले. यानुसार जिल्ह्यातील सर्व मंदिरे, मशिदी आणि चर्च यांसमोर येथे बालविवाहास परवानगी नाही असे स्पष्ट फलक लावण्यात आले आहेत.

MSVT संस्थेचे अध्यक्ष श्री.मनोज गावंड यांनी सांगितले, "बालविवाह रोखण्यासाठी सर्वप्रथम धार्मिक नेत्यांना सहभागी करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या वतीनेच विवाह विधी पूर्ण होतो. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाल्यास बालविवाहावर प्रभावीपणे आळा घालता येतो."

शिक्षेचे गांभीर्य समजावतना गावंड यांनी पुढे सांगितले की, बालविवाह प्रतिबंध अधिनियम (PCMA), 2006 अंतर्गत बालविवाह आयोजित करणे, सेवा देणे किंवा प्रोत्साहन देणे हा दंडनीय गुन्हा आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास व दंड होऊ शकतो. तसेच, 18 वर्षांखालील मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवणे हे POCSO कायद्यानुसार बलात्कार ठरते. त्यामुळे धार्मिक नेत्यांनीही या बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.

गतवर्षी MSVT व सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यामानाने आणि  जिल्हा महिला व बालविकास ठाणे, यांच्या मदततीने ठाणे जिल्ह्यात  18 बालविवाह थांबवले आहेत. हे यश स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग आणि समुदायातील स्वयंसेवकांच्या सक्रिय सहकार्यामुळे शक्य झाले आहे.MSVT ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन (JRC) नेटवर्कचा भागीदार असून, हे नेटवर्क 416 जिल्ह्यांमध्ये बालहक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. JRC च्या वतीने देशभरात गेल्या काही वर्षांत दोन लाखांहून अधिक बालविवाह रोखले गेले असून, पाच कोटी नागरिकांनी बालविवाहविरोधी शपथ घेतली आहे.

आज जिल्ह्यातील अनेक पंडित, मौलवी, पाद्री स्वतःहून पुढे येऊन बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी मुलींच्या वयाची खात्री केल्याशिवाय विवाह विधी पार पाडण्यास नकार दिला आहे. हा बदल समाजासाठी अत्यंत सकारात्मक आहे, असे MSVT संस्थेचे विश्वस्त ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, धर्मगुरूंनी जर ठाम भूमिका घेतली, तर बालविवाहासारखा घातक प्रकार देशातून नष्ट होऊ शकतो. आम्ही लवकरच ठाणे हा बालविवाहमुक्त जिल्हा बनवणार आहोत, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे."

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ