शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

 

    ठाणे,दि.27(जिमाका) :- येत्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागेल. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये आलेली  घट गृहीत धरून विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगाम 2025 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै, 2025 अशी आहे.

         योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवणे गरजेचे आहे.  पिक विमा नुकसान भरपाईसाठी ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे.

    कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाकडून नियुक्त भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. कोकण विभागातल्या भात, नाचणी व उडिद पिकांकरिता विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हा - ठाणे, पालघर, रायगड,  रत्नागिरी व सिंधुदुर्ग – पीक – भात, विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर)-61 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) - 457.50.

जिल्हा - ठाणे, पालघर, रत्नागिरी - पीक – नाचणी, विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर)- 35 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) - 87.50.

जिल्हा – रायगड व सिंधुदुर्ग - पीक – नाचणी, विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) - 40 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) - 100.

जिल्हा - पालघर - पीक – पडीद, विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) - 25 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (रु./हेक्टर) – 62.50.

              ही योजना कर्जदार बिगर कर्जदार शेतऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. पीक विम्यासाटी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात.  शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सुलभता यावी व बँकामधील गर्दी टाळावी याकरिता शेतकऱ्यांचे अर्ज कॉमन सर्विस सेंटर (CSC) मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत.

       शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरिता योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे बालाजी ताटे यांनी केले आहे.            

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”