आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचा सन्मान

भारतमाता की जय.. वंदे मातरम् च्या जयघोषाने दुमदुमले सभागृह


ठाणे,दि.25(जिमाका):- आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे. सभागृहात आता उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश अन् देशासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे, हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे केले.

भारतामध्ये दि.25 जून 1975 ते दि.31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिसा डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी प्र.उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसलेले आणीबाणीविरोधी सत्याग्रही, दिवंगत आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचे वारस, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आणीबाणीच्या काळात लढा देताना दिवंगत झालेल्या सत्याग्रहींना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या सत्याग्रहींचा अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींपैकी प्रातिनिधीक स्वरूपात श्री.अनिल भदे, अनुराधा जुवेकर, रमेश बेदमुथा यांनी आणीबाणी कालावधीतील आपले अनुभव कथन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले. यावेळी त्यांनी आणीबाणी काळातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”