अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

ठाणे,दि.26(जिमाका):- राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता दि.15 जून 2025 ते दि.30 जून 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये 1) कृषी सहाय्यकांमार्फत प्रत्येक गावातील या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विशेष मेळावा आयोजित करून योजनेची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्याकरिता नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन वितरक व सेवा व सेतू केंद्रांचे प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच मोहीम स्वरुपात कॅम्प घेऊन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. 2) सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाच्या योजनांची माहिती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 3) अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याकरिता स्थानिक वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी इ. च्या माध्यमातून व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. 4) महाडीबीटी पोर्टलवर जिल्हानिहाय / तालुकनिहाय दर्शविलेल्या लक्षांकाच्या प्रमाणात या दोन्ही प्रवर्गातील पुरेसे अर्ज उपलब्ध नसतील तर अशा तालुक्यांमध्ये/मंडळामध्ये/गावामध्ये व्यापक प्रसिद्धी देऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 5) राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारकांना 55% व इतर भूधारकांना 45% अनुदान अदा करण्यात येते. तसेच शासन पत्र क्र. डीबीटी-0324/प्र.क्र.71/14अ. दि.10 जून, 2024 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अदा करण्यात येईल. उर्वरीत 10% / 15% अनुदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधून अदा करुन एकूण 90% अनुदान अदा करण्यात येईल.

तरी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विशेष मोहीम योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”