ठाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या समन्वयाने कल्याण येथे सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न
ठाणे,दि.21(जिमाका):- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, स्थानिक नगरसेवक व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे दि.20 जुलै रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरास माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली.
या आरोग्य शिबिरात स्थानिक नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या, रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी, स्त्रीरोग व बालरोग तज्ञांच्या सल्ल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच मोफत औषध वाटप, चष्मे वाटप, अंध काठी वाटप, वृद्धांसाठी चरण सेवा आरोग्य जनजागृतीपर माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिबिरातील वैद्यकीय टीमचे व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, ठाणे यांचे कौतुक करताना सांगितले की, “सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढते आणि त्याचा थेट लाभ त्यांना मिळतो.”
या आरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली व वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्थानिक संस्था, स्वयंसेवक, डॉक्टर व प्रशासन यांचे विशेष योगदान लाभले.
00000

Comments
Post a Comment