महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे 'पर्यटनाचा महाकुंभ 2025' चे आयोजन
ठाणे,दि.22(जिमाका):- महाराष्ट्र हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. सह्याद्रीपासून कोकण किनारपट्टीपर्यंत, विदर्भाच्या वन्यजीवांपासून मराठवाड्याच्या वारशापर्यंत, राज्याची पर्यटन संपदा अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. यामुळेच महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक पातळीवर अधिक बळकटपणे सादर करण्याची संधी साधत महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (डायरोक्टरेट ऑफ टुरिझम (DOT)) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पर्यटनाचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने येत्या शनिवार व रविवार दि.23 व 24 ऑगस्ट 2025 रोजी पुणे सेंट्रल हॉल, डेक्कन येथे पर्यटनाचा महाकुंभ 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून "आपला जिल्हा, आपले पर्यटन" ही थिम आहे. मुख्य प्रायोजक महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, प्रायोजक रॉयल गोल्डफील्ड कब रिसॉर्ट आणि संकल्पना व ट्रॅव्हल पार्टनर स्मिता हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पर्यटनाचा महाकुंभ आयोजिला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण सेंट्रल पार्क हॉटेल, जंगली महाराज रोड, डेक्कन पुणे असून वेळ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचे पर्यटन स्टॉल्स, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि विशेष वैशिष्ट्यांचे दर्शन घडणार असून, सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विशेष प्रचार यामध्ये करण्यात येणार आहे.
नागरिकांनी व पर्यटकप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत अधिक संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
00000

Comments
Post a Comment