'महाज्योती'च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी
ठाणे,दि.22(जिमाका):- राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास (एसबीसी) प्रवर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी, याकरिता परीक्षेच्या पूर्व तयारीकरिता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. 2025-26 सत्रासाठी 'महाज्योती' यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मचारी निवड आयोग (एसएससी-सीजीएल), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) आणि भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) तर्फे असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी 28 जुलै 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.
इच्छुक विद्यार्थ्यांना www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर 20 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्जाची शेवटचा दिनांक असताना राज्यभरातून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी 'महाज्योती'च्या हेल्प लाईन नंबरवर फोन करून या सर्व परीक्षांच्या अर्जाची मुदतवाढ करण्यासंदर्भात विनंती केली होती. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अर्जाची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांच्या यशाची शक्यता अधिक बळकट होईल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा 'महाज्योती'चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी दिली आहे.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल ‘महाज्योती’तर्फे उचलले आहे. या योजनेंतर्गत टॅबलेट, 6 GB डेटा प्रतिदिन, नियमित चाचण्या, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वैयक्तिक सल्ला व अभ्यास साहित्य अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत पुरविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. परिक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा 'महाज्योती'चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रांबाबत दक्षता बाळगा: मिलिंद नारिंगे
'महाज्योती'च्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन एसएससी-सीजीएल, एमईएस, आयबीपीएस-(पीओ) आणि एलआयसी (एएओ)-2025-26 ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकित करुन स्पष्ट दिसतील, असे स्कॅन करुन अपलोड करावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अर्ज हा स्वीकृत होणार. तसेच पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार, अशी माहिती सुद्धा व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतांना आधार कार्ड, जातीचा प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला असेही 'महाज्योती'तर्फे कळविण्यात आले आहे.
प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरीटच्या आधारे निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे. ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात येत्या 31 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तसेच अधिक माहितीसाठी 0712- 2870120/121 या क्रमांकावर संपर्क करावे. या प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात 'महाज्योती'च्या विद्यार्थ्यांनी घ्यावे, असे आवाहनही ‘महाज्योती’चे संचालक मिलिंद नारिंगे यांनी केलेले आहे.
00000
Comments
Post a Comment